पुणे : आम्ही ललितला पकडण्याच्या अगदी जवळ असल्याचे पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगत आहेत. मात्र, असे असले तरी अमली पदार्थांचे रॅकेट ससूनमधून चालविणारा फरार आरोपी ललित पाटील अद्यापही फरार आहे. त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. कदाचित कोणताही तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळत नसल्याने ललित त्यांना सापडणे अवघड झाले आहे. ललित ससून रुग्णालयातून पळून जाण्यामागे अथवा पोलिसांना न सापडण्यामागे राजकीय पाठबळ तर नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
ससून रुग्णालयातील वॉर्ड क्र. १६ या कैदी वॉर्डमध्ये ललितप्रमाणे अन्य प्रकरणांतील व्हीआयपी आरोपीदेखील गेल्या अनेक दिवसांपासून तळ ठोकून आहेत. यातीलच एका आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणातील कैद्याचा रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यासाठी थेट राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळींकडून ससून प्रशासनावर दबाव आणला जात होता. एवढेच नाही तर डिस्चार्ज कार्डवर सही करणाऱ्या डॉक्टरला घरचा रस्ता दाखवण्याची धमकी दिली दिली, अशी माहिती देखील समोर आली आहे. याच अनुषंगाने ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील हे महागडे ड्रग्ज बनवत होते. नुकतेच नाशिक येथून पाटील बंधूंचे ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ देखील मुंबई पोलिसांनी जप्त केले, मात्र आरोपी फरार असल्याने अनेक शंकांना वाव मिळत आहे.
‘ससून’ प्रशासनाची भूमिका संशयास्पद
ज्यावेळी गुन्हे शाखेला ससून रुग्णालयातून ड्रग विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती, तेव्हा गुन्हे शाखेने कारवाईसाठी ससूनमध्ये धडक दिली. त्यावेळी पोलिस पथकाला ससून रुग्णालय प्रशासनाने कारागृह आणि न्यायालयीन विषय असल्याचे सांगत रोखले. ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना ललितवर केले जाणारे उपचार आणि आजार याबाबत विचारले असता, त्यांनी ही बाब गोपनीय असल्याचे सांगितले. यामुळे ससून रुग्णालय प्रशासनाच्या भूमिका संशयास्पदच असल्याचे दिसून येत आहे.
...अन्यथा पुण्याचा होईल ‘उडता पंजाब’
पाकिस्तानातून पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग येत होते. त्यामुळे पंजाबमधील युवा पिढी नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले होते. तेथील घटनांवर आधारित एक चित्रपटदेखील प्रसिद्ध झाला होता. पंजाबप्रमाणे आता पुणेदेखील अमली पदार्थ विक्रेत्यांचे हब बनले आहे. ज्या शहरात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात तेथे ड्रग विक्री जोरात, असे यामागचे समीकरण आहे. पाटील बंधूंसारखे ड्रग डीलर जर स्वत: ड्रग बनवून बाजारात विकत असतील तर यातून युवा पिढीला वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. नशेत डुबणाऱ्या पुण्याला किनाऱ्यावर आणण्यासाठी शहरातील कोरेगाव पार्क, विमाननगर, हिंजवडी, बालेवाडी या भागातील पबमध्ये वेळेची मर्यादा, वयाची मर्यादा याचे काटेकोर पालन करायला हवे. या ठिकाणी होणारी मद्य विक्री, एजंटमार्फत होणारी अमली पदार्थांची विक्री यावर पोलिसांनी कडक पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा पुण्याचा ‘उडता पंजाब’ होण्यासाठी वेळ लागणार नाही.