इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये साठ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी करण्यात आल्या आहेत. मात्र या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. त्याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे हर्षवर्धन पाटील यांच्या गटातटात वर्चस्वासाठी लढाई सुरु आहे. आता सरपंच निवडीवरून देखील सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करत राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने उभे ठाकले आहेत.
इंदापूर तालुक्यातील साठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या ४० ग्रामपंचायती व २ संमिश्र वर्चस्व निर्माण झाले आहे असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तर इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये ६० पैकी ३८ ग्रामपंचायतीवर भाजपचेच निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले असल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे .
भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील विरोधक हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी, इतक्या ग्रामपंचायती आमच्या विचाराच्या आल्या. आशा चुकीच्या बातम्या पसरवू लागले आहेत. परंतु ज्या साठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये तब्बल ४० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व झाले आहे. तर दोन ग्रामपंचायती संमिश्र आले आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती च्या विकासासाठी मी कटिबद्ध असून गावातील रस्ते पिण्याचे पाणी वीज या मूलभूत सुविधा प्रत्येक गावाला दिल्या जातील. त्यामुळे तालुक्यातील कोणताही नागरिक, विरोधकांच्या भूल थापांना कधीही फसत नाही. तसेच इंदापूर तालुक्याचा सुरु असलेल्या विकासाचा महापुर विरोधकांना देखवत नाही, अशी टीका राज्यमंत्री भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.
इंदापूर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व- हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत तसेच सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये बहुमताने भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला असून या निवडीत भाजपचे सर्वाधिक ३८ सरपंच व उपसरपंच झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील जनतेने तसेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सत्ताधार्यांच्या विरोधात स्पष्ट विरोधी कौल दिला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा विषय आता संपला असून कार्यकर्त्यांना आवाहन करतो की गावात शांतता राहावी, सर्वांनी एकत्रित येऊन गावाचा विकास करावा. निवडून आलेले सरपंच व उपसरपंच, सदस्यांचे मनापासूनचे अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा पाटील यांनी दिल्या. ______________