युगंधर ताजणे निशा व्यवसायाने इंजिनिअर. पुण्यातील एका मोठ्या कंपनीत कामाला. अरुण नावाच्या एका व्यक्तीची तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. फेसबुकवरील आपल्या मित्र यादीतील अनेक मित्र अरुणचे ‘म्युच्युअल फ्रेंड’ असल्याने निशाने कुठलाही विचार न करता ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. थोड्याच दिवसांत आपण केलेल्या चुकीच्या निर्णयाची तिला मोठी किंमत चुकवावी लागली. तब्बल दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम अरुणने तिच्याकडून या फेसबुकच्या माध्यमातून घेऊन तिची फसवणूक केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रत्यक्षात अरुणचे फेसबुकवरील ते अकाऊंट बनावट असल्याचे समोर आले.
‘परदेशातून आलो असून कस्टमने अडवले आहे. त्यात तुमच्याकरिता आणलेले गिफ्ट अडकले आहेत. ते सोडविण्याकरिता पैशांची गरज आहे. पैसे ट्रान्सफर करून गिफ्ट तुमच्या पत्त्यावर थोड्याच वेळेत पोहोचेल,’ अशी बतावणी करून अनेक तोतया फेसबुक युझर्सनी महिलांना गंडा घालून नाकीनऊ आणले आहेत. फेसबुकच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. आपण ज्या कुणा अनोळखी मित्राची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत आहोत, त्याची कुठलीही शहानिशा न करता ती स्वीकारली गेल्याने त्यांना फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे.
ज्येष्ठ महिलांनादेखील वस्तू घरपोच देण्याचा बहाणा करून गंडा घातल्याच्या तक्रारी सायबर पोलीस खात्याकडे दाखल होत आहेत. औषधे, सौंदर्यप्रसाधने, कपडे, शोभेच्या वस्तू, जिमकरिता आवश्यक वस्तू, महागडी अत्तरे याबरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी करून प्रत्यक्षात अवाच्या सवा रक्कम मोजून दुसरीच वस्तू घेण्याची वेळ फसवणूक झालेल्या व्यक्तीवर आली आहे. केवळ एखाद्या व्यक्तीकडूनच नव्हे, तर कंपनीदेखील आपल्या वस्तूंची खोटी जाहिरात प्रसिद्ध करून ग्राहकांना ती वस्तू घेण्याकरिता आकर्षित करते. फेसबुकवर ज्या वस्तूची खरेदी ग्राहकांना केली आहे ती प्रत्यक्षात स्वीकारल्यानंतर दुसरीच वस्तू आपल्याला मिळाल्याच्या तक्रारी ग्राहकांनी दाखल केल्या आहेत.
बनावट खाते तयार करून एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. त्या व्यक्तीचे प्रोफाइल पाहिल्यास त्यावर त्याने त्याची सगळी खोटी माहिती अपलोड केलेली असते. मात्र, प्रथमदर्शनी हे लक्षात येत नाही.
अनोळखी व्यक्ती सहानुभूती दाखवून खोटी आश्वासने देऊन समोरच्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढते. विश्वास संपादन करण्याकरिता समोरच्या व्यक्तीला वस्तू पाठवते. पुढे ही ओळख झाल्यानंतर संबंधित मुलगी किंवा महिलेचे फोटो मागवून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पैशांची मागणी केली जाते.
काय काळजी घ्याल ?अनोळखी व्यक्तीची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. स्वीकारली गेल्यास त्या व्यक्तीच्या प्रोफाइलची खात्री करावी.फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणाºया मित्राचे अनेक मित्र हे आपल्या फ्रेंड लिस्टमधीलच (म्युच्युअल फ्रेंड) असतात. अशा वेळी आपल्या मित्रांकडे संबंधित व्यक्तीची चौकशी करणे महत्त्वाचे आहे.नव्याने फ्रेंड लिस्टमध्ये सहभागी झालेल्या मित्राने दिलेल्या कुठल्याही आमिष व भूलथापांना बळी न पडणेस्वत:ची कुठल्याही स्वरूपातील वैयक्तिक माहिती (उदा.- फोटो, बँक डिटेल्स, कौटुंबिक, व्यावसायिक माहिती) अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये.
सोशल मीडिया अॅडिक्शन ठरतेय डोकेदुखीमुळात फेसबुकवर एखाद्या अनोळखीची माहिती खरी की खोटी, हे ओळखणे अवघड आहे. आपण नेमक्या कुठल्या पद्धतीची माहिती शेअर करीत आहोत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्या माहितीची जबाबदारी फेसबुक वापरकर्त्यांची आहे. आजकाल सोशल मीडियाच्या वाढत चालल्या अॅडिक्शनमुळे नवीन समस्या तयार होत आहेत. जोडीदाराची कमतरता, मुलीच्या नावाने प्रोफाइल तयार करून ओळख वाढविण्याची विकृती, केवळ टाइमपासच्या नावाखाली सतत आॅनलाइन राहणे आणि आर्थिक फायदा घेण्याच्या हेतूने ओळख वाढवून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. -अॅड. रोहन व्हनकळस, सायबर तज्ज्ञ
फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चॅटिंग सुरू होते. अनोळखी व्यक्तीच्या अनेक भूलथापा आणि आमिषाला मुली व महिला बळी पडतात. कौटुंबिक अडचणींमुळे आलेली एकटेपणाची भावना वाढलेल्या मुली आणि महिला यांची संख्या मोठी आहे. त्या भावनिक आधाराकरिता बºयाचदा अशा भूलथापांना बळी पडतात. फेसबुकवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत आणि प्रेमात रूपांतर होते. प्रेमाच्या नावाखाली संबंधित व्यक्तीकडून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत. फसवणूक करणारी व्यक्ती नव्याने मैत्री केलेल्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक फेसबुकवरून घेऊन पर्सनल चॅट करण्यास सुरुवात करते. याबाबत विशेषत: मुली व महिला यांनी काळजी घेण्याची गरज आहे. - जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, पुणे सायबर गुन्हे शाखा