राजू इनामदार पुणे: शहरातील विधानसभेच्या आठही जागांवर वर्चस्व असतानाही त्यातील दोन जागा गमवाव्या लागण्यावर भाजपाच्या शहर शाखेत आता चिंतन सुरू झाले आहे. मात्र या स्थानिक चिंतनाचा रोष थेट वरिष्ठांवर जात असून भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप होत असतानाही पाठीशी घातले गेले त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. या दोन जागा तर गमावल्याच शिवाय अन्य तीन जागांवर निसटता विजय मिळाल्याने त्यावरही बोलले जात आहे. लोकसभेच्या विजयाची पक्षातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना चढलेली झिंग मतदारांच्या या झटक्याने ओसरली असल्याचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा कानोसा घेतला असल्याचे निदर्शनास येते आहे. ज्या बळावर भाजपाकडून शहरातील विरोधकांना त्यांचे अस्तित्त्वच दिसत नसल्याची टिका केली जात होती ते बळच आता ओसरले आहे. मागील ५ वर्षातील स्थानिकपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाला पुण्यात भरघोस यश मिळाले. लोकसभेच्या दोन्ही निवडणूका, त्या मधल्या काळात युती नसताना झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आठही विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व मिळवले. त्यानंतर पालिकेची निवडणूक झाली त्यात ९८ नगरसेवक निवडून आणले व स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले. तेव्हापासूनच भाजपाचा पुण्यातील राजकीय रथ जमीनीपासून चार अंगूळे वरून चालू लागला. दिल्लीत व राज्यात जे राजकारण खेळले गेले तेच गल्लीतही सुरू झाले. भाजपाच्या पालिकेत निवडून आलेल्या ९८ नगरसेवकांमध्ये तब्बल ३२ नगरसेवक हे दुसºया पक्षातून घेतलेले आहेत. तोच प्रकार आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवकांना, नेत्यांना पक्षाने विधानसभा मतदारसंघातील त्यांचे प्राबल्य लक्षात घेऊन पक्षात प्रवेश दिले. हा प्रकार इतका वाढला की मतदानास फक्त ८ दिवस असताना वडगावशेरीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर भाजपात प्रवेश दिला. मतदारांना भाजपाचा हा धूडगूस आवडलेला नाही. राज्यातील मतदारांनी जो इशारा दिला अगदी तसाच इशारा पुणेकर मतदारांनी भाजपाला दिला. हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांच्यावर असंख्य आरोप झाले. त्यात महागडी चारचाकी गाडी भेट घेण्यापासून ते एखाद्या कामात निविदा दाखल करण्यापर्यंतचे अनेक आरोप होते. त्यातील काही कागदपत्रांसह केले गेले. असे असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावली. भाषणांमध्ये त्यांचे गुणगान गायले. आरोप जसे जनतेत गेले तसे हे गुणगानही गेले.
जनतेने ते लक्षात ठेवून टिळेकरांना, पर्यायाने भाजपाला नाकारले हे स्पष्ट दिसत असल्याचे भाजपातील काही जुन्या, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मत आहे. त्याचवेळी आम्ही त्यांना जरा जपून चाला असा इशारा दिल्याचे पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते आता सांगत आहेत. विरोधकांना सन्मान देणे जणू विसरले असल्याचेच भाजपाच्या नेत्यांचे वर्तन त्यांच्या नव्हे तर पक्षाच्या अंगाशी आले असे स्पष्ट मत हे कार्यकर्ते व्यक्त करतात. दोन पराभवांबरोबरच शिवाजीनगर, खडकवासला व कॅन्टोन्मेट या तीन विधानसभा मतदारसंघातील निसटते विजयही भाजपाला खंत वाटावी असेच आहेत. त्यावरही पक्षात चर्चा होते आहे. या तीनही मतदारसंघांमध्ये विरोधकांनी भाजपाला दमवले. तिथेही स्थानिक विरोधकांना भाजपाकडून कस्पटाप्रमाणे लेखले व वागवले गेले. मतदारांना भाजपा पदाधिकारी, आमदार यांचे हे वर्तन दिसत होते. भाजपाचे हे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात की ही भाजपाची संस्कृती नव्हती, पण काहींनी ती आणली, मतदारांना ते आवडलेले नाही हेच त्यांनी मतांच्या माध्यमातून सांगितले. पक्षाच्या नेता स्तरावर आता यासंदर्भात चर्चा, चिंतन व्हायचे तेव्हा होईल, कार्यकर्ता व माजी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ता स्तरावर मात्र आताच सुरू झाले आहे.