पिंपरी : सुरक्षिततेसाठी शोरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, पण चेंजिंग रूममध्ये त्या कॅमेऱ्यांची आवश्यकता काय, असा प्रश्न नागरिकांमधूून विचारला जात असून, पोलिसांनी दक्षता घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.एका महिला केंद्रीय मंत्र्याने दोन दिवसांपूर्वी गोव्यातील एका शोरूममधील चेंजिंग रूममध्ये बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निदर्शनास आणून दिले. तसेच कोल्हापूरलाही चेंजिंग रूमच्या बाहेरून महिलेचे चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पिंपरी-चिंचवडसह भोसरी, निगडी, सांगवी, पिंपळे सौदागर या भागात ब्रँडेड कपड्यांची मोठमोठी दालने आहेत. शहरातील, तसेच लगतच्या गावांतील ग्राहक तेथे खरेदीसाठी येतात. प्रवेशद्वारात ग्राहकाचे स्वागत केले जाते. त्यांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जाते. सुरक्षिततेसाठी प्रवेशद्वार, तसेच शोरूममध्ये विविध ठिकाणी कॅमेरे बसविले जातात. त्यामुळे शोरूममधील हालचालींवर लक्ष ठेवले जाते. मात्र, चेंजिंग रूममध्ये कॅमेरे बसविण्याची परवानगी नसतानाही त्या ठिकाणी छुपे कॅमेरे बसविले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कपडे खरेदी करण्यापूर्वी ‘ट्रायल’ घेण्यासाठी चेंजिंग रूमचा आधार घेतला जातो. मात्र, महिला छुप्या कॅमेऱ्याच्या जाळ्यात फसतात. अनेकांच्या तर शोरूममधून बाहेर पडल्यानंतरही ही बाब लक्षात येत नाही. ग्राहकांना या छुप्या कॅमेऱ्याबाबतची पुरेपूर माहिती नसते. शोरूममध्ये केवळ कपडे खरेदी करणे इतकेच त्यांच्या नजरेसमोर असते. मात्र, त्यामुळे होणाऱ्या अनेक परिणामांना महिलांना सामोरे जावे लागते. (प्रतिनिधी)
चेंजिंग रूममध्ये कॅमेरे कशाला?
By admin | Published: April 06, 2015 5:37 AM