पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याचे स्पष्टीकरण देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.जर चित्राताईंना गटबाजीचा त्रास होता तर त्यांनी पूर्वीच राजीनामा का नाही दिला अशा शब्दात चाकणकर यांनी त्यांना फटकारले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज जाहीररीत्या भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर वाघ यांनी एका वृत्तावाहिनीलाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला, त्या त्या ठिकाणी मी आवाज उठवला, मी सरकारविरोधात अनेक आंदोलनं आणि मोर्चे काढले.मी गद्दार नाही, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला. पतीच्या चौकशीचा आणि भाजपा प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे.
चाकणकर यांनी मात्र वाघ यांना उत्तर दिले असून लोकमतशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'चित्राताईंनी तोंडातून फेस येईपर्यंत ज्या भाजपवर टीका केली , महिला अत्याचारावर काम करण्यासाठी सरकार असमर्थ आहे असं त्या म्हणायच्या, मुलींना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या राम कदम यांना बांगड्या भरण्याची भाषा त्यांनी केलीत्याच कळपात त्या सामील झाला आहेत. जिथे महिला सुरक्षित नाहीत अशाच पक्षात नाहीत त्या गेल्या आहेत. जर आमच्या पक्षात अंतर्गत गटबाजी आहे तर त्या पक्षात का थांबल्या असा माझा सवाल आहे. त्यांनी आधीच राजीनामा का नाही दिला असेही त्या म्हणाल्या.