पुणे : कुठलाही साथीचा राेग झाल्यानंतर एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा उल्लेख हाेत असताे. स्वाईन फ्लूपासून या संस्थेचे महत्त्व अधिक अधाेरेखित झाले. प्राण्यांमार्फत हाेणाऱ्या साथिच्या राेगांवार संशाेधन करणारी एनआयव्ही ही भारतातील एकमेव संस्था आहे. 1952 साली पुण्यात या संस्थेची स्थापना करण्यात आली.
काेराेना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील अनेक नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. भारतात 29 जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला काेराेनाची लागण झाली आहे की नाही याची तपासणी एनआयव्ही संस्थेकडून करण्यात येते. देशभरातील संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले जातात. या आधी स्वाईन फ्लू तसेच निपाह विषाणूची लागण झाली आहे की नाही याची तपासणी सुद्धा एनआयव्हीकडूनच केली जात हाेती.
एनआयव्ही संस्था काय करते एनआयव्ही ही विषाणूजन्य राेगांवर संशाेधन करणारी भारतातील एकमेव संस्था आहे. विषाणूजन्य राेगांवर लस शाेधून काढण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. देशभरातील तज्ञ संशाेधक या संस्थेमध्ये संशाेधन करतात. एचआयव्ही एड्स या आजारावर देखील या संस्थेद्वारे माेठ्याप्रमाणावर संशाेधन करण्यात येत आहे. जागतिक आराेग्य संघटनेसाेबत देखील ही संस्था काम करते. या संस्थेकडून प्राण्यांमार्फत संसर्गजन्य राेग कसा हाेताे, त्याची कुठली लक्षणे शरिरावर दिसतात, त्यावर काय उपाय केले जाऊ शकतात यावर संशाेधन करण्यात येते. या संस्थेची माेठी प्रयाेगशाळा असून तेथे विविध प्रयाेग केले जातात.