पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. तेलंगातून ताब्यात घेतल्यानंतर कोरटकरला घेऊन पोलिसांचे पथक आज, मंगळवारी सकाळी कोल्हापुरात पोचले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता २८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. हा चिल्लर माणूस तुम्हाला एक महिना का सापडत नव्हता? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे असं शेट्टी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
प्रशांत कोरटकरची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी, संतप्त शिवप्रेमींना चकवा देत न्यायालयात केले हजर
शेट्टी म्हणाले, खरंतर मुख्यमंत्री म्हणतायेत की, कोरटकर चिल्लर माणूस आहे. हा चिल्लर माणूस तुम्हाला एक महिना का सापडत नव्हता? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. खरंतर कोरटकर असो, सोलापूरकर असो अशा प्रकारची माणसं जाणीवपूर्वक त्यांना वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी पेरणी केलेली आहे. कारण आज जे काय ज्वलंत प्रश्न आहेत. आज शेतकऱ्यांचे एफआरपी मिळत नाही. व सोयाबीन उत्पादकांचं सोयाबीन खरेदी केलं जात नाही. हरभरा खरेदी केंद्र सुरू होत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दंगली घडतायेत, स्त्रिया सुरक्षित नाहीत. हे सारे जनसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत. ते प्रश्न भलतीकडंच राहिले आहेत. लोकांना वळवण्यासाठी संवेदनशील विषयाला स्पर्श करून लोकांची माथी भडकवायची आणि आपलं अपयश लपवायचं. हेच याच्या पाठीमागचं कारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
कोरटकरला पकडण्यात यश आलं
प्रशांत कोरटकर तेलंगणाच्या दिशाने गेल्याचे एका टोलनाक्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाले होते. कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात त्याचा शोध सुरू केला होता. मात्र महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या पाहिल्यानंतर कोरटकर पुन्हा एकदा चकवा देण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात तेथील दुचाकी भाड्याने घेतल्या. या दुचाकींवरून पोलिसांनी दोन ते तीन दिवस कोरटकरचा शोध घेतला. अखेर सोमवारी दुपारी तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनपासून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं.