पुणे : पुण्यातील तळेगावमधे येणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. यावरून आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तळेगावमध्ये आंदोलन केले. यानंतर पुणे, बारामतीच्या दौऱ्यावर आलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
आता विरोधक वेदांता प्रकल्प बाहेर गेल्याने रडत बसले आहेत. पण त्यांनी आधी चार मोठे प्रकल्प देशात येऊ का दिले नाहीत याचे उत्तर द्यावे असे ठणकावले. तसेच याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यातील विधानभवनातील पत्रकार परिषेत त्य़ा बोलत होत्या. या परिषदेला चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, बापू मानकर, माधुरी मिसाळ, राम शिंदे उपस्थित होते.
नाणार सारखा प्रकल्प येऊ दिला नाही. आशियामध्ये सर्वात मोठी ऑईल रिफायनरी ठरला असता. त्याला कोणी थांबवले? आरे मेट्रो कारशेड सारख्या प्रकल्पाला कोणी थांबवले होते. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला कोणी थांबवले होते? असा सवाल सीतारमण यांनी केला. याचबरोबर हे प्रकल्प जर झाले असते तर त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेले असते, म्हणून हे प्रकल्प रोखण्यात आल्याचा आरोप सीतारामण यांनी केला. आज राज्यातून एक प्रकल्प गेला तर विरोधक आरडाओरडा करत आहेत. पण देशातील मुख्य चार प्रकल्प कोणी येऊ दिले नाहीत? याला उत्तर महाविकास आघाडीने द्यावे त्यानंतरच आम्हाला प्रश्न विचारावेत असेही सीतारामण यांनी सुनावले.
सहकार क्षेत्रात राजकीय पोळी शेकणाऱ्या नेत्याने सहकारसाठी वेगळे मंत्रालय बनविण्यासाठी प्रयत्नही केला नाही. ते आता मोदींनी बनविले. राज्यात मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्र विस्तारलेले आहे, असेही सीतारामण म्हणाल्या. सध्या देशात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरांमध्ये घट झालीय यावर बोलताना निर्मला म्हणाल्या की "आमच्या चलनावर चांगली पकड आहे. बाकीच्या देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली आहे. अर्थमंत्रालय या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे."