पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला श्री क्षेत्र देहू येथे येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहू नगरीत सुरू आहे. या कामाचा आढावा आज भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला. तसेच पाटील यांनी यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्यात.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वारकरी बांधव येणार असून, नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हातात चॉकलेट्स चा बॉक्स दिसला. सगळ्यांना ते एक एक चॉकलेट काढून हातात देत होते. आता हे चॉकलेट त्यांच्या नुकतंच झालेल्या वाढदिवसानिमित्त होतं की राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचं होतं, ते काही त्यांनी स्पष्ट केलं नाहीये. मात्र चंद्रकांत पाटील नेहमीच लोकांना चॉकलेट देतात हे सर्वश्रुत आहे...!
देहूत यावेळी भाजप प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, आ. राहुल कुल, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, आशा बुचके, यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.