बारामती : वाफगांव (ता.खेड,जि.पुणे ) येथील यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ल्याच्या संवर्धन करण्याच्या मागणीचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना चांगलाच खटकला. त्यांनी सरळ फोन करून पक्षाचे पद लावायचे नाही, तुमचा पक्षाशी काही संबंध नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक डॉ अर्चना पाटील यांनी केली आहे.
याबाबत डॉ. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. रुपाली चाकणकर या रयत शिक्षण संस्थेच्या कौन्सिलवर आहेत. रूपाली चाकणकर यांना धनगर समाजाविषयी एवढा द्वेष का? त्यांना पक्षाने आवर घातला पाहिजे. आम्ही पक्षाचे पदाधिकारी असलो तरी समाजाचे प्रश्न आम्हाला मांडावे लागतात आणि आम्ही समाजाचे प्रश्न मांडणार आहोत. राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांकडून जाणून-बुजून होळकरांच्या वस्तू दुर्लक्षित राहिल्या. त्यामुळे धनगर समाजामध्ये मोठी नाराजी आहे .
१९५५ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेने हा किल्ला शिक्षणासाठी ताब्यात घेतला. ऐतिहासिक वारसा जपण्यामध्ये संस्था कमी पडली आहे .तसेच मूळ किल्ल्याच्या वास्तूचे पावित्र्य भंग करून अनेक नवीन इमारती व इतर बांधकाम रयत शिक्षण संस्थेने किल्ल्यात केल्यामुळे किल्ल्याच्या पावसात धोका निर्माण झाला आहे .‘साहेब’ आपण या संस्थेचे अध्यक्ष आहात या प्रकरणी आपण लक्ष करून योग्य तो निर्णय घ्यावा.
रयत शिक्षण संस्थेच्या शाळेचे किल्ल्याबाहेर स्थलांतर करावे.संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज ३ डिसेंबर होळकर यांच्या जयंतीनिमित्त येत असतो. त्यामुळे आपण याकडे लक्ष देऊन किल्ल्याला स्मारक घोषित करून हा किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात द्यावा.किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून किल्ले संवर्धनासाठी ५० कोटीचा निधी जाहीर करावे अशी मागणी डॉ पाटील यांनी केली आहे.ही मागणी चाकणकर यांना खटकल्याची डॉ.पाटील यांची तक्रार आहे.