पुणे : "आ गये मेरे मौत का तमाशा देखणे..." क्रांतीवीर चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आहे. हा डायलॉग नाना पाटेकरांना कसा म्हंटला याची मोठी रंजक गोष्ट नानांनी एका कार्यक्रमात सांगितली. नाना म्हणाले, क्रांतीवीर चित्रपाटातील या शूटवेळी मी आजारी होतो. त्यावेळी मी दिग्दर्शकापासून सर्वांवर चिडलो होतो. त्यावेळी माझ्या मनात जे येईल ते मी बोलत गेलो आणि हा सिन शूट झाला. या शूटनंतर नाना लगेच दवाखान्यात गेल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) पुणेच्या वतीने अधिकारी आणि जवानांकरिता नाना पाटेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.यावेळी सीआयएसएफचे मुख्य कमांडंट एस. के. सुमन, सहाय्यक कमांडंट रविंद्र गाडे आणि धर्मेंद्र सिंग यांच्यासह किमान दोनशे जवान उपस्थित होते. यावेळी जवानांसोबत संवाद साधताना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी जवानांच्या जागेवर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांच्या प्रश्नांना मनमोकळ्या पध्दतीने उत्तरे दिली.
का नाकारली पहिली भूमिका?
नाना पुढे बोलताना म्हणाले, सुरुवातीला रस्त्यावरील झेब्रा क्राँसिंगचे पट्टे रंगवण्याचेही काम केले होते. त्याचकाळात नाट्यगृहातही काम केले. ते काम करत असतानाचा स्मिता पाटील यांच्याबरोबर ओळख झाली आणि त्याच्यामुळेच मी चित्रपट क्षेत्रात आलो, असं नाना म्हणाले.नाना पाटेकरांना बॉलिवूडमधील एका चित्रपटात काम करण्याची संधी आली होती.पण त्या चित्रपटात अतिरेक्याची भुमिका देण्यात आली होती म्हणून त्यांनी त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.कारण आपण पैशा कमावतो पण त्याबरोबर जर आपला आदर्श घेऊन जर त्या पध्दतीने काम केले पाहिजे. आपल्या चित्रपटांतून देशातील युवकांमध्ये चांगले संस्कार घडवता येऊ शकते, हे नानांनी त्यावेळी दाखवून दिले होते.