- किरण शिंदेपुणे - पुण्यातील स्वारगेट बसस्थाकामध्ये काल बुधवारी एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे, या रिपोर्टमध्ये तरुणीवर दोनवेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत. दरम्यान, आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट येथील घटना स्थळाची पाहणी करून माध्यमांशी बोलतांना घटना घडल्यानंतर ती त्वरित जाहीर का केली नाही याबाबत भूमिका स्पष्ट केली. योगेश कदम म्हणाले,'पोलिसांची तात्काळ कारवाई केली असून आरोपीचा शोध सुरू घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी ८ पथके तयार करण्यात आली आहेत. संभाव्य ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गोपनीयता राखण्याचा निर्णय का?घटना घडल्यानंतर ती त्वरित जाहीर का केली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र आरोपी अलर्ट होऊन पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी गोपनीयता पाळली, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. घटना लपवली नसून, तपासाची दिशा योग्य राहावी यासाठी खबरदारी घेण्यात आली,असेही सांगण्यात आले आहे. स्वारगेट परिसरात पोलिस गस्तघटनेच्या पाच तास आधीच पोलिसांनी स्वारगेट बसस्थानकात दोन राऊंड मारले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. आरोपीबाबत माहिती द्या, १ लाख रुपयांचे बक्षीस जिंका पुणे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. कोणत्याही नागरिकाला आरोपीबाबत माहिती असल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एसटी प्रशासन व सुरक्षेचा आढावा स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर सुरक्षेबाबत गंभीर चर्चा सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४३७ कोटी रुपयांचा निधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी मंजूर केला आहे.एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित हे कॅमेरे कार्यरत करण्यात येणार आहेत, अशी माहिती कदम यांनी दिली.परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक लवकरच एसटी प्रशासन व सुरक्षेविषयी भूमिका स्पष्ट करणार आहेत. स्वारगेट बसस्थानक परिसरात सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षा रक्षक तैनात होते, मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष झाले अशी माहिती मिळत आहे. यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर नव्याने विचार केला जात आहे.