पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर राष्ट्रवादीकडून ईडी विरोधात आंदोलनं केली जात आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही महाविकास आघाडी नेत्यांची यादी जाहीर केली आहे. येत्या दोन तीन दिवसात अनेकांवर लवकरच कारवाई होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
''ज्या दिवशी ९३च्या बॉम्बस्फोटांनंतर नेमलेल्या समितीचा अहवाल बाहेर येईल, त्यादिवशी अनेकांना तोंड दाखवण्याचीही जागा उरणार नाही. तसेच तुरुंगातही त्यांच्यासाठी जागा उरणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून काल दिला होता. त्यालाच पुण्यातून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विटरवरून उत्तर दिलं आहे.''
''पाच वर्षे तुमची सत्ता होती, तुमचे मालक गृहमंत्री होते, तेव्हा का नाही सुचलं हे शहाणपण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर हा अहवाल, तो अहवाल, बैलगाडी भरून पुरावे ही सगळी नाटकं फक्त सत्ता मिळवण्यासाठी असतात. एकदा सत्ता मिळाली की चिक्की अन तूरडाळ पचवण्यात तुमचा कार्यकाळ संपतो असंही ते म्हणाले आहेत.''
विविध माध्यमातून वारंवार नवाब मालिकांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू
''केंद्र सरकारमधील सत्ताधारी भाजप वारंवार विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता निर्भीडपणे आपली भूमिका मांडणाऱ्या नवाब मालिकांना दोन दिवसापासून सातत्याने त्रास देण्याची भूमिका ईडी ने घेतली आहे. पहाटे पाच वाजता कुठलाही समन्स न बजावता अचानकपणे त्यांच्या घरावर धाड टाकने असो किंवा समन्स न बजावतात केलेली अटक असो अशा विविध माध्यमातून वारंवार नवाब मालिकांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच मलिक साहेबांना पाठिंबा देण्यासाठी तसेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या या घाणेरड्या वृत्तीचा राष्ट्रवादीकडून आंदोलनातून निषेध करण्यात आला आहे.''
दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ५ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर ७ वाजल्यापासून नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु होती. ८ तासांच्या चौकशीनंतर ईडीनं मलिकांना अटक केली. मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. ईडीने मलिकांना विशेष कोर्टासमोर हजर केले. तेव्हा कोर्टाने नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.