पुणे : ‘हिंदूचे सरकार’ अशी वल्गना करत फिरता. मग गणेशोत्सव, दहीहंडी हे हिंदूचे सण साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता?, असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांत मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्या, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली.
धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब आमराळे, संजय बालगुडे, भाऊ करपे, यश वाघमारे, प्रशांत सुरवसे, रोहन सुरवसे यांच्यासह शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेत निवेदन दिले.
धंगेकर यांनी गणेशोत्सव, दहीहंडी या उत्सवावरील निर्बंध आम्ही हटवले असून निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. उत्सव काळातील ५ दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगीही सरकारने दिली होती. असे असताना मंडळांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळी कलमे लावून गुन्हे दाखल केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध उठवलेले असताना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना त्रास देणे, अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार पोलिसांकडून सुरू आहेत. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने होत आहे. ती तातडीने थांबवावी व दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली.