बारामती : आपल्या श्रद्धास्थानाचा मुद्दा काढून आणखी नवे प्रश्न निर्माण करायचे नसतात. तीनशे चारशे वर्षापूर्वी येथे काही तरी होते. तेथे काही तरी होते. असे मुद्दे देशात काढले जात आहेत. जे झालं ते झालं ते कशाला आता का काढता तुम्हाला काही करायचे असेल नविन करा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्ञानवापी मशिदीच्या चर्चेवरून भाजपवर निशाणा साधला.
बारामती येथील एका कार्यक्रमामध्ये रविवारी (दि. २९) उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, कायदा सुव्यवस्था अडचणीत आणायची. वातावरण गढूळ करायचे. या गोष्टी बरोबर नाहीत. याची नोंद सर्वांनी घ्यावी. हा असं म्हणाला आता तुमचं काय म्हणणं आहे? असे काही जण विचारतात. अरे तो म्हणला त्याच्याशी मला काय करायचे आहे. त्याचं म्हणणं त्याला लखलाभ मला माझं लखलाभ असो. एकान काही म्हणलं की दुसऱ्यांन काहीतरी म्हणायचं हे काही बरोबर नाही, असेही अजित पवार म्हणाले.
तुमच्या अडचणी जीएसटी कॉन्सिल समोर मांडू
जिएसटीबाबत केंद्र सरकार खुप आग्रही आहे. तुम्ही सांगितलेल्या अडचणी आम्ही फार तर जीएसटी कॉन्सिल समोर मांडू. परंतू राज्य सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. जीएसटी बाबत ज्या सुचना केल्या आहेत. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुमची अडचण होते. हे मलाही कळते. अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिला.
मला कोणावरही टिका करायची नाही
ज्या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले, उपमुख्यमंत्री पद आतापर्यंत मिळाले त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे. तिथे शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो. तुम्हीच ती लोकं निवडून देता. मला कोणावरही टिका करायची नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाकडी निंबोडी योजनेवरून सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकिय परिस्थितीवर भाष्य केले.