पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. याच वर्षी १४ ऑगस्टला पुरंदरे यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु बाबासाहेबांनी शंभरी पूर्ण न करताच यावर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. असंख्य राजकीय नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्ष आणि नागरिकांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांचे उत्तम व्यंगचित्र काढून श्रद्धांजली वाहिली.
त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरंदरेंचे अस्थी विसर्जन किल्ल्यांवर करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु होती. रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर अस्थींचे विसर्जन केले जाणार असल्याचे वृत्त माध्यमात आहे. त्यावरुन, अनेक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही यावरुन खोचक शब्दात टीका केली आहे. मात्र, मनसेनं हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केले आहे.
''खरे तर मेल्यानंतर वैर संपते.ब.मो पुरंदरेंनी छ.शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंची बदनामी केली आहे.ब.मो.पुरंदरेंच्या अस्थी विसर्जन गडकिल्यांवर करण्यापेक्षा रेशीमबागेतील आरएसएसच्या मुख्यालयात करावे. छत्रपतींचे गडकिल्ले आम्हां बहुजनांना प्रेरणा देतात. असे ट्विट वरपे केले आहे. त्यावर निशाणा साधत पुणे शहर मनसे अध्यक्ष वसंत मोरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून खुलासा केला आहे.''
वसंत मोरेंचा खुलासा
''काही नालायकांना इतकी आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची काळजी वाटते ना, तर आरे किती तरी परमिट रूमला, लॉजला, दारूच्या दुकानांना ही छत्रपतींनी मोठ्या कष्टाने तयार केलेल्या किल्यांची नावे आहेत. तिकडे तुमची मर्दुमकी दाखवा की का उगाच तोंडाची गटारे उघडताय. "राजगड" हे आमच्या ऑफिसचे ही नाव आहे. आणि पवित्र अपवित्र ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? असे म्हणत मोरे यांनी खुलासा केला आहे.