काळ बदलला की कलाही बदलत जाते. पूर्वी मनोरंजनाची, करमणुकीची साधने मर्यादित होती. त्यामुळे कलेला मानाचे स्थान होते. काळाच्या ओघात मनोरंजनाचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध झाले. कलेचा आयामही बदलत गेला. लोकांच्या आवडीनिवडीनुसार कलेचा प्रकार, पोत, सादरीकरणाची पद्धत यातही फरक पडला. त्यामुळे तेव्हाची कला चांगली आणि आताची वाईट, असा फरक करता येणार नाही, कला आणि साधना हे कलावंतांसाठी सर्वस्व असते. तो मनापासून कला सादर करत असतो, कलेचा वारसा पुढे नेत असतो. जुन्या लोकांना त्यांचे दिवस चांगले वाटतात, आताच्या रसिकांना सध्याची कला चांगली वाटते. बदलत्या पिढीनुसार असा फरक होतच राहणार.पूर्वीच्या काळी तरुणींना या क्षेत्रात येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागायचा. स्त्रीने कलेच्या क्षेत्रात स्थिरावणे समाजमान्य नव्हते. त्यामुळे संघर्ष अटळ होता. त्यातूनच जिद्दीने चांगले काम करण्याची प्रेरणा मिळायची. आताच्या मुली असा संघर्ष करू शकतील, असे वाटत नाही. आताच्या काळात नृत्य, अभिनयासह लावणीलाही चांगले दिवस आले आहेत. आजकाल लावणीला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. काही वर्षांपूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. लावणी म्हटले, की भलेभले नाके मुरडत असत. आता सुशिक्षित घरातील मुलीही हौसेने लावणी शिकतात. कार्यक्रमांमध्येही तरुणी आवडीने सहभागी होतात.मी सुरुवातीच्या काळात नृत्याचे कार्यक्रम करायचे. ‘रंगीला’ या हिंदी चित्रपटात मला ब्रेक मिळाला. राजाभाऊ ठाकूर, अनंत माने यांच्यासारख्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. ‘लीला गांधी नृत्यदर्शन’ हा कार्यक्रम मला राज्यभर सादर करता आला. गुडघेदुखीमुळे कार्यक्रम पुढे चालवता आले नाहीत. मी ‘महाकवी कालिदास’ या नाटकात भूमिका साकारत होते. या नाटकासाठी संवाद संस्कृतमध्ये म्हणणे गरजेचे होते. माझ्या बोलण्यात ग्रामीण बाज होता. त्या वेळी गोविंद कुलकर्णी यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. नृत्य, नाटक, चित्रपट अशा प्रवासाने मला आयुष्यात खूप काही दिले, याचे कायम समाधान वाटते. संध्याबार्इंचे नृत्य कायम माझ्या मनात रुंजी घालत राहिले. त्यांनी कामातून स्वत:ला सिद्ध केले. मला कायम त्यांच्यापासून प्रेरणा मिळत गेली.कला ही कलावंताचे सर्वस्व असते, कलेला जातपात, धर्म, प्रदेश, भाषा असे कोणतेच बंधन नसते. त्यामुळेच ती मनाला भिडते. कला ही आपल्या संस्कृतीची ओळख असते. ती जपण्यासाठी कलावंत निष्ठेने धडपडत असतो. ज्येष्ठ कलाकारांनी एके काळी कलेचे क्षेत्र गाजवलेले असते. त्यांचे या क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असते. मात्र, उतारवयात कलावंतांना हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. शासनाकडून ज्येष्ठ कलावंतांना तुटपुंजे मानधन दिले जाते आणि तेही वेळेवर मिळत नाही. बरेच कलावंत आश्रमांमध्ये राहून गुजराण करत आहेत. सध्याच्या काळात महागाई वाढली आहे, तुटपुंज्या मानधनामध्ये महिन्याचा खर्च भागत नाही. कलावंतांचे योगदान लक्षात घेऊन शासनाने त्यांना शोधून, खºया गरजू कलाकारांना मानधन देण्याची सोय करायला हवी.मानधन आजकाल थेट बँक खात्यात जमा होते. मात्र, अनेक कलाकारांना बँकेबद्दल ज्ञान नसते. त्यांनी अशा वेळी काय करायचे? ज्येष्ठ कलावंत शासनाच्या पुरस्कारांपासूनही वंचित राहता कामा नयेत. शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता मानधन वाढवून आणि वेळेत द्यावे.
शासनाला ज्येष्ठ कलाकारांची आठवण का नाही? लीला गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 2:49 AM