जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत अजित पवार का दाखवत नाहीत? किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 04:00 PM2021-09-09T16:00:29+5:302021-09-09T16:01:23+5:30
शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रे दिली आणि उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी हा महाराष्ट्र मी भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही.
पुणे : महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने २ जुलै रोजी मोठी कारवाई करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. ईडीची ही कारवाई अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते. सोमय्या म्हणाले, साताऱ्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांच्या मालकीचा जरंडेश्वर कारखाना 65 कोटिना घेतला आणि त्यावर 700 कोटींचे कर्ज घेतले.शरद पवारांना यासाठी सहकार चळवळ हवी आहे का ? जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रे उघड करण्याची हिम्मत अजित पवार का दाखवत नाहीत? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.
शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रे दिली आणि उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी हा महाराष्ट्र मी भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंच्या डर्टी एलेव्हन मध्ये जितेंद्र आव्हाड या बाराव्या खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्याबाबतचे पुरावे लवकरच समोर आणणार असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
काय आहे नेमकं प्रकरण ?
सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू असताना जरंडेश्वर कारखान्याने बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं स्पष्ट झालं. यावरुनच ईडीने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरुपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं.