पुणे : 'मोदींनी, शहांनी सर्व राजकारण खराब करून टाकले आहे. लोकसभा निवडणुक होईपर्यंत अनेक अटक सत्रे होणार आहेत. इडीला पैसै खाणारे भाजपवाले का दिसत नाहीत? ज्यांना निवडून दिले, ते काम करीत नसल्याने मतदारांनी निवडणूक हाती घ्यावी. अनैतिक कारभारी बदलणे हाच सत्याग्रह आहे,’’ असे आवाहन युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
रविवारी गांधी भवन येथे झालेल्या लोकसंसदमध्ये परिवर्तनाचा निर्धार करण्यात आला. युवक क्रांती दल, रिपब्लिक युवा मोर्चा, निर्भय बनो, पँथर आर्मी, स्वराज्य क्रांती सेना, संविधान प्रचारक चळवळ, सत्यशोधक बहुजन आघाडी, संविधानिक राष्ट्रवाद मंच आणि अभ्यासिका विद्यार्थी कृती समिती यांच्या वतीने लोकसंसदचे आयोजन केले होते. केंद्र सरकार भारतीय संसदेला धर्मसंसद बनविण्याचा प्रयत्न करत आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपविरोधी पक्ष संघटनांनी रविवारी, दि.४ फेब्रुवारी रोजी ‘लोकसंसद’ हा कार्यक्रम आयोजित केला.
युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कोथरूड येथील गांधी भवनात दुपारी एक ते सायंकाळी पाच या झाला . लोकसंसदेत रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे हे स्वागताध्यक्ष होते. डॉ.विश्वंभर चौधरी, डॉ अभिजित वैद्य,अभ्यासक चंद्रकांत झटाले, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार शहा, धर्मगुरू बिशप थॉमस डाबरे, ह भ प धर्मकिर्ती परभणीकर, युनूस तांबटकर अशा अनेक मान्यवरांनी भाषणे केली.
सभागृहात डॉ अभिजित वैद्य,डॉ. अच्युत गोडबोले, आनंद करंदीकर,डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉ प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, प्रशांत कोठदिया, फिरोज मुल्ला,अभय छाजेड, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, उत्पल व. बा., रवींद्र धनक,अप्पा अनारसे, एम एस जाधव, इद्रिस कारी सुदर्शन चखाले उपस्थित होते.
डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले,'इंडिया आघाडीची ताकद अजूनही चांगली आहे. भाजप आपली ताकद फुगवून सांगत आहे. भाजपचे दक्षिणेचे दार बंद झाले आहेत. पूर्वोत्तर भागात भाजप विरोधी वातावरण आहे. विरोधी पक्षाला हतबलता वाटली तर नागरिकांनी, सिव्हील सोसायटीने पुढे येवून या पक्षांना युद्धासाठी तयार केले पाहिजे. शेतकरी भाजपाच्या विरोधात गेले आहेत.आर्थिक धोरणांमुळे मोदी सरकार हरणार आहेत. बिशप थॉमस डाबरे म्हणाले, 'संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा महाराष्ट्र आहे. धर्मा धर्मात असंतोष वाढीस लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अल्पसंख्य समुदायाला सुरक्षित वाटेल असे वातावरण देशात असले पाहिजे. कोणीही इतर धर्मा विरोधात विधाने करता कामा नये. गरिबांची स्थिती सुधारली पाहिजे'.