पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 01:15 PM2024-07-11T13:15:02+5:302024-07-11T13:15:32+5:30

ग्रामीण भागात ड्रोनची दहशत पसरली असून वारंवार चौकशीची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही

Why drones are being flown in rural areas of Pune Home Minister devendra fadanvis should explain Amol Kolhe | पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे

पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे

मंचर : ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनची दहशत पसरली आहे. वारंवार चौकशी करण्याची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन देऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

मंचर येथील शरद पवार सभागृहात आज खासदार कोल्हे यांनी जनता दरबार घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आजच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिक नेत्याशिवाय अथवा शिफारशी शिवाय समस्या घेऊन आले होते. प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा दुवा जनता दरबार आहे. यापुढे प्रत्येक तालुक्यात दर महिन्याला जनता दरबार सुरू ठेवणार असल्याचे सांगून कोल्हे म्हणाले, महसूल, रस्ते, वीज मंडळ, पोलिस यासंदर्भात अनेक समस्या आल्या आहेत. शंभर अधिकारी उपस्थित होते. त्यांना या समस्यांचे निराकरण करण्याची सूचना केली आहे. या भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार चौकशीची मागणी करूनही समर्पक उत्तर दिली जात नाहीत. याबाबत मी पत्र दिले होते. प्रशासनाने त्याबाबत अद्याप गांभीर्याने घेतले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोललो असता त्यांच्याकडून कारवाई करू असे उत्तर येत आहे. ग्रामीण भागात अनोळखी ड्रोनमुळे भयाण वातावरण निर्माण झाले असून, सदर ड्रोन कशासाठी वापरले जातात याचे निवेदन व स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी विधानसभेत द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

‘माझी लाडकी बहीण’ योजना चालू राहण्याची जबाबदारी युती सरकारने घेतलेली नाही. केवळ तीन महिन्याचे पैसे मिळतील, पुढे काय होईल याबाबत माहीत नाही, असे त्यांनी सांगितले. इतर पक्षातील कार्यकर्ते महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र इतर पक्षातील कार्यकर्त्यांना का घ्यायचे हा प्रश्न आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अवमान करणार नाही, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत १८० ते १९० जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा दावा खासदार कोल्हे यांनी केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, बाळासाहेब बाणखेले, पूजा वळसे, सुरेश अण्णा निघोट आदी उपस्थित होते.

खासदार कोल्हे यांनी प्रथमच मंचर येथे जनता दरबार घेतल्याने त्याला प्रतिसाद मिळाला. गावोगावचे नागरिक निवेदन घेऊन आले होते. सकाळी सुरू झालेला हा जनता दरबार दुपारपर्यंत सुरू होता. असा जनता दरबार कायम घेतल्यास नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली.

Web Title: Why drones are being flown in rural areas of Pune Home Minister devendra fadanvis should explain Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.