पुणे : एम. जे. अकबरसारखे मंत्री किंवा चेतन भगतसारखे लेखक यांच्यासारख्यांना त्या पदांवर, प्रतिष्ठेवर राहण्याचा अधिकारच नाही. एम. जे. अकबर यांना मोदी सरकार का पाठीशी घालत आहे? ११ महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सरकारने त्यांना निलंबित करायला हवे किंवा त्यांनी स्वत: पायउतार व्हायला हवे. त्यांच्याकडे मंत्रिपद राहणे हे लेखक, माणूस म्हणून मला मुळीच मान्य नाही. त्यांच्यावर कारवाई होणार नसेल तर हे सरकार स्त्रीपूजक नाही असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘मी टू’ चळवळीला पाठिंबा दर्शवला.
आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीचे शोषण होतच आले आहे. ‘मी टू’ चळवळीच्या माध्यमातून शोषणाला वाचा फुटली आहे. लैंगिक शोषण झाल्याचे जाहीरपणे सांगताना खूप धाडस दाखवावे लागते. स्वत:च्या बदनामीची चर्चा न करता ती व्यक्त होत आहे. किमान यापुढे तरी पुरुषाने स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणून पाहू नये. चेतन भगत स्वत:ला लेखक म्हणवतो. आपल्या साहित्यातून त्याने स्त्रीच्या अभिव्यक्तीबाबत सन्मानाने लिहिले आहे. असा लेखक जेव्हा लैंगिक शोषण करतो, तेव्हा फार वाईट वाटते. तुमच्याभोवती वलय निर्माण झाले, की हव्या त्या स्त्रीवर आपण हक्क गाजवू शकतो, ही मानसिकताच चुकीची आहे.लैंगिक अत्याचाराचे प्रकार सिनेमा, राजकारण, पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रांत घडत आहेत. ‘मी टू’च्या माध्यमातून या वाईट प्रवृत्तींविरोधात आवाज उठविला जात आहे. त्यामुळे माझा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.
मी टू प्रकरणी त्वरित कारवाई व्हावीदेशमुख म्हणाले, ‘‘मी टू’च्या माध्यमातून ज्या लोकांची नावे पुढे आली आहेत, त्यांच्यावर त्वरित आणि कडक कारवाई व्हायला हवी. प्रशासनाला कोणताही चेहरा नसतो. तिथेही वाईट प्रवृत्ती आहेतच; मात्र त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. पद आणि जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्यावर मर्यादा येतात. स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी मानसिकता मोडीत निघायला हवी. नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्री दत्ता यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. महिला आयोगाने त्यांना नोटीसही बजावली असून, चौैकशी सुरू झाली आहे.’’