Ajit Pawar: भारतात गरज असताना लस निर्यात का केली, केंद्राचा निर्णय चुकला; अजित पवारांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 02:53 PM2021-05-07T14:53:31+5:302021-05-07T14:53:59+5:30
Ajit Pawar: कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
कोरोना विरोधी लसींच्या तुटवड्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारतात लस तयार होतेय पण भारतातील नागरिकांना ती मुबलक प्रमाणात मिळत नाही. मग उपयोग काय? कोरोना संकटात लस निर्यातिचा केंद्राचा निर्णय चुकला, असा घणाघात अजित पवार यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते.
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोरोना लसींच्या तुटवड्याबाबत विचारण्यात आलं असता अजित पवार यांनी केंद्राला धारेवर धरलं. "देशात कोरोना विरोधी दोन लसींची निर्मिती होत आहे. एक सीरम आणि दुसरी भारत बायोटेककडून लस निर्मिती केली जातेय. पण देशातील जनतेलाच लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीय. हे अत्यंत चुकीचं आहे. रशियानंही त्यांच्याकडील जनतेला लसीकरण झाल्यानंतर स्पुटनिक-व्ही लसीची निर्यात सुरू केली. आपल्याकडील जनतेचं लसीकरण अद्याप झालेलं नसतानाही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहे. केंद्राचा लस निर्यातीचा निर्णय चुकला. याचा मोठा फटका जनतेला बसतोय", असं अजित पवार म्हणाले.
लसीच्या दरातील तफावत कशासाठी?
"कोव्हॅक्सीनचा दर ४०० रुपये तर कोव्हिशील्डचा जर ३०० रुपये राज्यांसाठी ठरविण्यात आला आहे. पण केंद्राला हाच जर १८० रुपये इतका आहे. यात खूप तफावत आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारलाही कमी दरात लस मिळायला हवी. अदर पुनावालांशी माझं बोलणं झालं आहे. पण ते पुढील काही दिवस परदेशातच असणार आहेत. ते इथं आले की समोरासमोर बैठकीतून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल", असं अजित पवार म्हणाले.
परदेशी लसींची आयात करायला परवानगी द्या
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण होणं फार गरजेचं झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं परदेशी लसींची आयात करण्याला परवानगी द्यायला हवी. जेणेकरुन जास्तीत जास्त लस उपलब्ध होतील, असं अजित पवार म्हणाले.