पुणे: लेखक भालचंद्र नेमाडे लिखित '' हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ'' या कादंबरीतून बंजारा समाजाबाबत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद लिखाण केले आहे. कुठल्याही समाजाबद्दल वाईट वक्तव्य केले तरी गुन्हा नोंदवला जातो. पण भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात जळगाव आणि भोसरीत गुन्हा नोंदवूनही त्याची दखल घेतली जात नाही. पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा बंजारा समाज मोर्चा काढणार आहे, असा इशारा अॅड. रमेश राठोड यांनी दिला आहे.
अॅड. रमेश राठोड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. राठोड म्हणाले, भालचंद्र नेमाडे हे उत्कृष्ट लेखक आहेत. त्यांना ज्ञानपीठ, पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. अशा प्रतिष्ठित व्यक्तीकडून एखाद्या समाजाबद्दल आक्षेपार्ह लिखाण कोणालाच अपेक्षित नाही. बंजारा समाजातील स्त्रिया हडप्पा संस्कृतीपासूनच वेश्या व्यवसाय करत आहेत, समाजात त्यांची हीच ओळख आहे, पुरुष जुगार खेळण, दारू पिणे, दरोडेखोरी पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. अशी वाक्ये कादंबरीत नमूद केली आहेत. बंजारा हा अल्पसंख्याक नागरिकांचा समाज आहे. त्यामध्ये असंख्य नागरिक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्यावर अजूनही समाजात अन्याय होतात. पण ते आवाज उठवू शकत नाहीत. बंजारा समाजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.