पुणे : ससून रुग्णालयात अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर आणि मुलगा डाॅ. अमेय ठाकूर या ठाकूर पितापुत्रांसाठी ‘खास’ व्यवस्था केल्या आहेत. त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर आहे. शस्त्रक्रिया (सर्जरी) विभागाच्या दुसऱ्या डाॅक्टरांनी हे थिएटर वापरू नये म्हणून त्याला चक्क कुलूप लावले जाते. या ऑपरेशन थिएटरला ‘ट्रान्स्प्लांट ओटी’ असे नाव देण्यात आले आहे.
या स्पेशल शस्त्रक्रिया कक्षात बेरियाट्रिक शस्त्रक्रियेचे साहित्य आहे. तसेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचे चांगली साधनेदेखील याच शस्त्रक्रियागृहात आहेत. लॅप्राेस्काेपिक एंडाेस्काेपी, स्टॅप्लर ही शस्त्रक्रियेची अत्याधुनिक साधनेदेखील याच खास शस्त्रक्रियागृहात ठेवण्यात आली आहेत आणि त्यांनाच कुलूप लावण्यात आले आहे. याच ठिकाणी शस्त्रक्रिया करतानाचे व्हिडिओ काढले जातात आणि त्याचे एडिटिंग करून ते प्रसारित केले जातात.
दुसऱ्या डाॅक्टरला थिएटर दिल्याने सिस्टरला मेमाे
ठाकूर पितापुत्रांसाठी राखीव ठेवलेले हे ऑपरेशन थिएटर शस्त्रक्रिया विभागाच्या दुसऱ्या डाॅक्टरांना देण्यात येत नाही. इतरांसाठी वेगळे शस्त्रक्रियागृह आहे. हे स्पेशल थिएटर द्यायचे असल्यास खास परवानगी घ्यावी लागते. त्याची चावी परिचारिकांकडे असते. एकदा या परिचारिकेने परस्पर दुसऱ्या युनिटच्या डाॅक्टरांना दिल्याने तिला थेट मेमाे देण्यात आला, अशी माहिती ससूनमधील सूत्रांनी दिली.
प्रशस्त केबिन अन् थिएटर काेणाच्या पैशांतून?
या थिएटरमध्येच तीन ते चार केबिनची ताेडफाेड करून डाॅ. अमेय ठाकूर यांच्यासाठी प्रशस्त केबिन उभी केली आहे. लाखाे रुपयांचा खर्च करून हे थिएटर आणि डाॅ. अमेय यांच्यासाठी केबिन केली. काेणाच्या पैशांतून ती उभी केली, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. तसेच डाॅ. अमेय हे ओपीडी, इमर्जन्सी शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांना शिकवणे असे काही न करता केवळ स्पेशल ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया करतात, असाही आराेप करण्यात येत आहे.
इतरांसाठी जागा अपुरी
अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष आणि केबिन बनविल्याचा फटका इतर डाॅक्टरांना बसला आहे. या ठिकाणी इंटर्न डाॅक्टरांपासून, निवासी डाॅक्टर, लेक्चरर, सहयाेगी प्राध्यापक यांना कपडे बदलण्यासाठी महिला व पुरुष अशा दाेनच केबिन आहेत.