पुणे : पुण्यातील १४ वर्षीय सामूहिक बलात्कार प्रकरण तपासात पुणेपोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी करत आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे, असे कौतुकोद्गार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढले. याचवेळी त्यांनी हेच ते पुणे पोलीस मुख्यालय आणि इथेच संजय राठोडचं प्रकरण घडलं. पण पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी असाच तपास का केला नाही? असा संतप्त सवालही वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. ८) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत वानवडी बलात्कार प्रकरणाची माहिती घेतली.यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या, १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार या घटना मान शरमेने खाली जाईल अशीच आहे. या प्रकरणात जवळपास १३ ते १४ आरोपी समोर आले आहेत. पुणे पोलिसांनी अतिशय चांगला व योग्य पद्धतीने तपास करतानाच आत्तापर्यंत १४ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणातही असाच तपास पुणे पोलिसांनी का केला नाही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. तसेच समाजातील दिवसेंदिवस विकृती वाढत चालली आहे. १४ आरोपींपैकी १२ जण विवाहित आहे. त्यांना हा प्रकार करताना काहीच कसं वाटलं नाही असेही वाघ यांनी सांगितलं.
पूजा तडस प्रकरणावर वाघ म्हणाल्या... पूजा तडस तिच्याबरोबर माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे. पूजाचा संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तडस यांचा हा घरगुती वाद आहे तो समोर आला कसा यात कुठलेही राजकारण केलं जातं नाही.
करुणा शर्मा यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर भाष्य... पोलिसांनी करुणा शर्मा यांच्यावर ज्याप्रकारे कारवाई केली ती कुठल्या आधारे करण्यात आली याची माहिती पोलिसांनी द्यायला हवी. करुणा शर्मा यांच्याबाबतीत सत्तेचा गैरवापर बाबतीत झाला असल्याचा आरोप करतानाच बीडमध्ये सध्या गुंडाराज सुरु असल्याची टीकाही वाघ यांनी केली आहे.