पुणे : कलाकारांना धर्माच्या चौकटीत बांधता येत नाही, कारण कलाकाराला कोणताही धर्म नसतो, मात्र पाकिस्तानातील कलाकार भारतात बक्कळ पैसा कमावतात पण दहशतवादाबद्दल एक चकार शब्द काढत नाहीत. यहॉंकी खाते, कमाते,और वहाकी गाते, अशी तोफ डागत पाकिस्तानी कलाकारांवर भारतात कायमची बंदी घातली पाहिजे, अशा शब्दातं ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. राजन आणि साजन मिश्रा यांनी पाकिस्तानी कलाकारांवर टीकास्त्र सोडले. पुण्यातील तालायन संस्थेच्या वतीने पं. साजन मिश्रा यांच्या षष्ट्यब्दी निमित्त हर्षोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दहशतवाद आणि पाकिस्तानच्या भूमिकेमुळे त्या देशात संगीताचे कार्यक्रम होत नाहीत, कोणीही जाऊन तिकडे आपली कला सादर करू शकत नाही. एकेकाळी लाहोर हा संगीताचा अभेद्य किल्ला मानला जात होता, आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही देशांनी यासंदर्भात विचार करणे गरजेचे असून, युद्ध पुकारण्यापेक्षा तोच पैसा दोन्ही देशांच्या पुढील पिढ्यांच्या शिक्षणावर खर्चला गेला तर सगळ्यांचे भले होईल,युद्धाने काही साध्य होणार नाही, मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्व बाबींचा विचार व्हायला हवा. तालायन संस्थेचे संचालक प्रसिद्ध तबला वादक अरविंदकुमार आझाद या वेळी उपस्थित होते.
दहशतवादावर का बोलत नाहीत ?
By admin | Published: October 06, 2016 4:00 AM