हडपसर -स्वारगेट-हडपसर दरम्यानचा दीड-दोन किमीचा बीआरटी मार्ग मागील दीड वर्षापूर्वी काढून टाकला आहे. मात्र, बसथांबे रस्त्यात असल्याने प्रवाशांना धोकादायक ठरत आहेत, तर बीआरटीसाठीचे सूचना फलक वाहनचालकांना गोंधळात टाकणारे ठरत आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गच शिल्लक नाही, तर सूचनाफलक तातडीने हटवावेत, अशी मागणी केली जात आहे.
सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी चौकातील वाहतूक शाखेसमोरील सिग्नलच्या खांबावर फक्त सार्वजनिक बसकरिता असा फलक लावलेला आहे. या ठिकाणी बीआरटी मार्ग शिल्लक नाही. मग सूचनाफलक का लावला आहे, तसेच चौकात पुण्याकडे आणि हडपसरकडे जाणाऱ्या बसेसाठीचे थांबे आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून बसथांब्यापर्यंत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अपंगांची हेळसांड होत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून येथील सूचना फलक हटवावेत. तसेच बसथांबा रस्त्याच्या बाजूला घेऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे.
नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले की, सोलापूर रस्ता डीपीमध्ये 60 मीटर रुंदीचा दाखविला आहे. त्याचबरोबर बीआरटी प्रकल्प राबविण्यासाठी किमान 45 मीटर रस्ता रुंद असणे अपेक्षित आहे. मात्र, सद्यस्थितीत सोलापूर रस्ता 36 मीटर आहे. त्यामुळे येथे बीआरटी प्रकल्प राबवता येणार नसल्याने बीआरटीचे बसथांबे प्रशासनाने बाजूला घ्यावेत. तसेच सायकल ट्रॅक आणि पदपथ काढून रस्ता रुंद करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
----------------
बीआरटी मार्ग आणि सूचना फलकाविषयी निर्णय झालेला नाही. मात्र, पुढील पंधरा दिवसांत बसथांबे रस्त्याच्या बाजूला घेतले जाणार आहेत. तसेच सार्वजनिक बसेससाठी आणि बीआरटी मार्गासाठीचे सूचना फलकही काढून टाकले जातील.
- व्ही. जी. कुलकर्णी, रस्ते विभाग, महापालिका