लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनाही आंदोलनजीवी म्हणणार का, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांची ‘आंदोलनजीवी’ अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे डॉ. बाबा आढाव आणि त्यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अपमान झाला. याविरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे ‘माफी आंदोलन’ करण्यात आले. प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ११) डॉ. आढाव यांची भेट घेतली.
‘क्षुद्र राजकारणासाठी देशाच्या पंतप्रधानांनी चळवळीतील आपल्यासारख्या अनेक ज्येष्ठांचा अपमान केला आहे. आंदोलनाची महती त्यांना माहीत नाही. आपल्यासारख्या अनेक ज्येष्ठांनी उभालेल्या चळवळींमुळेच देश येथपर्यंत पोहोचू शकला. आंदोलनातून समाजाची जडणघडण होत असते. नवा, समृध्द समाज निर्माण होत असतो, हे यांना माहीत नाही,’ असे या वेळी देशमुख म्हणाले.
‘माफी आंदोलना’च्या माध्यमातून समाजात बदल घडवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना भेटून त्यांची ‘माफी’ मागण्याचे आंदोलन आम्ही सुरू ठेवणार आहोत. त्याचबरोबर आंदोलनाची महती पंतप्रधानांना समजावी यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना पत्रही पाठवीत आहेत, असे ते म्हणाले. याप्रसंगी संतोष नांगरे, विनोद पवार, प्रशांत कुदळ, नचिकेत साळवी, आनंद हंगारे उपस्थित होते.
फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांची ‘आंदोलनजीवी’ अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे डॉ. बाबा आढाव आणि त्यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अपमान झाला. याविरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे ‘माफी आंदोलन’ करण्यात आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ११) डॉ. आढाव यांची भेट घेतली.