पुणे : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहे. तसेच शहरातील दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करत प्रशासन आणि पोलिसांनी मंगळवारी(दि.२०) कारवाई केली जात आहे. तसेच काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र या कारवाईचा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी व्यापाऱ्यांना पूर्वकल्पना न देता या निर्णयाची अंमलबजावणी कशी काय करण्यात येत आहे असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
निवंगुणे म्हणाले, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्याची वेळ बदलल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुकानांच्या वेळा उद्यापासून बदलण्यात येणार आहे. त्यात सकाळी ७ ते ११ पर्यंतच दुकानांना परवानगी दिली आहे. त्यानंतर रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा देता येणार आहे. तसेच, उद्या घरपोच सेवा देण्यासाठी जाणाऱ्या दुकानदारांवर पोलीस कारवाई करणार नाहीत याची हमी कोण देणार? असेही निवंगुणे यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव व्यापाऱ्यांमुळे होत नसताना आणि सर्व नियमांची अंमलबजावणी करून व्यापारी वागत असतानाही प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारी दुकाने वगळता इतर सर्व व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांनी समाजाचा व सार्वजनिक आरोग्याचा विचार करून हा निर्णय देखील मान्य केला व लॉकडाऊनला साथ दिली. परंतु, प्रशासन व्यापाऱ्यांना गृहीत धरून निर्णय घेत आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांवर हा कोणता सूड उगवला जात आहे? याचं उत्तर प्रशासनाने द्यावे.