बारामती (पुणे) : ज्या वेळी राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवराय आणि महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर वक्तव्य केले होते. त्यावेळी आज जे आंदोलन करणारे लोक शांत का शांत बसले होते, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी भाजपसह शिंदे गट आणि 'मनसे'ला केला आहे.
पवार म्हणाले, जेव्हा 'हर हर महादेव' चित्रपटात शिवरायांच्या बाबतीत खोटा इतिहास दाखविला गेला, कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या पुतळ्याचा अवमान झाला त्यावेळी आज आंदोलन करणारे लोक गप्प का बसले, याचे आश्चर्य वाटते.
सावरकरांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे-
सावरकरांच्या बाबत काही बोलणार नाही. त्यांच्याबाबतचा माझा अभ्यास खरंच कच्चा आहे. अभ्यास नक्कीच करावा लागेल. मात्र याबाबत चर्चा झाली पाहिजे. शाहु, फुले, आंबेडकरांचा कोणताही विषय आला तिथे आपण त्यांचा इतिहास माहिती असल्याने लढतो. हे लढत नाहीत, ती गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे सावरकर यांच्याबाबतचा खरा इतिहास समजला पाहिजे. राहुल गांधी यांनी दाखविलेल्या पत्रात काय लिहिले होते, सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील शब्द आणि शब्द समजून घेणे आवश्यक आहे, असं रोहित पवार म्हणाले.
...श्रेय मिळणार नसल्याने विकासकामांना स्थगिती-लोकांच्या हिताच्या कामाला नारळ फोडायला जाता येत नाही. श्रेय मिळणार नसल्याने विकासकामांना स्थगिती देण्यात येते. माझ्या मतदारसंघात केवळ मला श्रेय मिळू नये यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विकास आराखडा, राशीनच्या देवीचा आराखडा आदी धार्मिक, विविध महत्वाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. जामखेडच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला विरोधकांच्या सांगण्यावरुन स्थगिती देण्यात आली आहे. सगळ्यात राजकारण पाहण्यापेक्षा लोकांचे हीत पाहा, लोक आता दुटप्पी राजकारण सहन करणार नाहीत. येत्या काळात लोक शांत बसणार नसल्याचा इशारा आमदार पवार यांनी दिला.