पुणे : शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान हे मंत्रासारखे पाठ करुन शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थी मार्क मिळविण्यापुरते विज्ञान शिकतात. माेठे झाल्यावर त्यांचे कुतूहल कमी हाेत जाते, त्यामुळे विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपण आपल्यातच शाेधायला हवे असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.
विज्ञान दिनानिमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकामध्ये शास्त्रज्ञांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. नारळीकर आणि आयुकाचे शास्त्रज्ञ साेमक रायचाैधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अवकाशात तारे असताना अवकाश काळे का दिसते ?, या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, अवकाशात जेवढे तारे आहेत तेवढे अवकाश प्रकाशमान करण्यासाठी पुरेसे नाहीत त्यामुळे ते तारे आपल्याला दिव्यांसारखे दिसतात. ताऱ्यांच्या रंगाबाबत बाेलताना ते म्हणाले, भाैतिक शास्त्रानुसार रेडिएशनच्या तापमानावरुन त्या ताऱ्याचा रंग ठरत असताे. आपल्याला लाल रंग सर्वात जास्त तप्त असताे असे वाटते, परंतु विज्ञानानुसार निळा रंग हा लालपेक्षा अधिक तप्त असताे. सुर्याबाबत बाेलताना ते म्हणाले, सुर्यासारखे अनेक तारे अकाशगंगेत आहेत. एका टप्यानंतर सुर्यात अनेक बदल हाेतील त्याचे तापमान बदलेल तसेच त्याचा आकारही बदलण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात विज्ञान जास्तीत जास्त कसे पाेहचायला हवे ?, या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, विज्ञान सर्वांपर्यंत पाेहचायला हवे, केवळ शहरांपुरते ते मर्यादित असता कामा नये. विविध संस्थाकडून मदत घेऊन गावांमध्ये विज्ञान सेंटर सुरु करता येऊ शकतील. बर्मुडा ट्रंगलमध्ये अनेक विचित्र गाेष्टी घडतात असे सांगितले जाते परंतु तिथे काही नसून त्या ठिकाणी हाेणारे अपघात इतर ठिकाणी सुद्धा हाेऊ शकतात असे बर्मुडा ट्रंगलजवळ राहणाऱ्या आपल्या मित्राने सांगितल्याचेही नारळीकर म्हणाले.