पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, ते निर्लज्ज आहेत, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करत खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. मात्र, पक्ष सोडणार का, आंदोलन करणार का, या प्रश्नावर भाजपला न दुखावता पक्ष कारवाई नक्की करेल, अशी गुळमुळीत भूमिका घेतली. त्याचवेळी अशा प्रवृत्तींना ठेचून काढू, नेस्तानाभूत करू, असा नेहमीचा पवित्रा त्यांनी या वेळी घेतला. येत्या २८ तारखेला भूमिका स्पष्ट करू असेही ते म्हणाले.
ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जुनाट झाले असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यावर तीव्र आक्षेप घेत सर्वधर्मसमभावाचा विचार मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य करण्याचे धाडस काही निर्लज्ज करत आहेत. अशा प्रवृत्तींना ठेचून काढू नेस्तनाभूत करू अशा शेलक्या शब्दांत टीका केली. मात्र, हे वक्तव्य केले तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही असा सवालही त्यांनी या वेळी केला. त्यामुळे याबाबत सर्व पक्षीयांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. असा निषेध करताना त्यांना मी कोश्यारींच्या विरोधात नाही पण अशा प्रवृ्त्तींचा विरोध करतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वपक्षीयांनी भूमिका स्पष्ट करावी
महाराजांनी लोकशाहीचा पुरस्कार केला. त्यामुळे देशात आता लोकशाही नांदत आहे. त्यांचे विचार कधीही जुने होऊ शकत नाहीत. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच देशात लोकशाही टिकून आहे. मात्र, सध्या देशात मीपणा वाढला आहे. सामान्यांना न्याय मिळत नाही. महिलांचे तुकडे केले जात आहेत. यापुढे महाराजांचा अवमान केल्यास खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
पक्ष म्हणून नव्हे शिवभक्त म्हणून विरोध
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण देत कोश्यारी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. याबाबत विचारले असता, त्यांनी फडणवीसांबाबत गुळमुळीत भूमिका घेत ते माझे मित्रच आहेत. मी पक्षाचा खासदार म्हणून हा विरोध करत नसून एक शिवभक्त म्हमून शिवभक्त म्हणून विरोध करत असल्याचे स्पष्ट करत पक्ष याची नक्कीच दखल घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटणार आहोत.
चार दिवसांची प्रतीक्षा
कोश्यारी व त्रिवेदी यांना हटवावे अशी मागणी करत त्यांनी येत्या सोमवारी भूमिका पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्याचे त्यांनी सांगितले. यासाठी तीन चार दिवसांचा वेळ आहे, पक्ष त्याविषयी काय भूमिका घेतो, त्यावर आपली पुढील रणनिती असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता त्यांनी कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा अवमान सहर केला जाणार असे सांगितले.