पुणे : महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटर आणि पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता मलिक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप करत असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून होत आहे. त्यावरच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
''सरकार तुमचा आहे तर मग चौकशी करा. आरोप करण्यात वेळ का घालवत आहात. संजय राऊत कमी होते का? आता नवाब मलिक ट्विट करायला लागले आहेत. सरकार तुमचं असताना तुम्हीच अन्याय - अन्याय म्हणून का ओरडायचं असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.'' पुण्यात पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.
''मलिक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना भाजपला मध्ये ओढण्याचे काम करत आहेत. कुठलाही पुरावा सादर न करता फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशाराही पाटलांनी मलिक यांना दिला आहे.''
पाटील म्हणाले, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेहमी सामान्य माणसांच्या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित करत आहे. महाराष्ट्रात पूर येऊन गेला. मराठवाड्यात लाखो हेकटर जमीन आणि पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा विमा, नुकसानभरपाई अजूनही मिळाली नाही. तसेच रोज नोंदवले जाणारे शेकडो गुन्हे महिला अत्याचारांचे आहेत. राज्यात एसटीच्या २९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या प्रश्नांवर बोलण्यासाठी काही नसल्यामुळे असे आरोप सुरु आहेत.
आघाडीतले अनेक मंत्री गायब
''महाविकास आघाडीमधील अनेक मंत्री गायब असल्याचे दिसून येत आहे. राठोड घरी बसून आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने आरोप केल्याचे समोर आले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख बेपत्ता आहेत. त्या सर्वांना सोडून वानखेडेंची काळजी करू नका. त्यांच्या मागे समाज अतिशय ठामपणे उभा राहील. आताचे गृहमंत्री असताना तुम्हाला पत्रकार परिषद का घ्यावी लागत आहे. चौकशी केल्यावर दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल. असही ते यावेळी म्हणाले आहेत.''