वाघोली : म्युजिक शोच्या नावाखाली अमली पदार्थांचा वापर होत असलेल्या सनबर्न कार्यक्रम गोवा राज्य सरकारने हद्दपार केलेला असताना महाराष्ट्र शासन अशा कार्यक्रमाला पाठिंबा देवून काय सिद्ध करू इच्छित आहे, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. केसनंद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी समितीच्या वतीने सनबर्न कार्यक्रमाची पार्श्वभूमी ग्रामस्थांना सांगून निषेध सभा घेण्यात आली.केसनंद येथे २८ ते ३१ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अभय वर्तक, रमेश शिंदे, नंदू रहाणे, चारुदत्त आफळे, संभाजी महाराज पालखी सोहळ््याचे संदीप भोंडवे, माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे, केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, तानाजी हरगुडे, रामदास हरगुडे, अलका सोनावणे, समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी सनबर्न कार्यक्रमाचा निषेध नोंदवून सनबर्न बंद व्हावा अशी मागणी केली. पोंक्षे म्हणाले, की विकसनशील देशामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या भारताला पोखरण्याचे काम सनबर्नसारख्या कार्यक्रमामधून होत आहे. गोव्यामध्ये चालणारा हा कार्यक्रम आमली पदार्थांच्या विळख्यामध्ये सापडला होता. याठिकाणी चालणाऱ्या अवैध कामामुळे गोवा राज्यसरकारने हद्दपार केला असताना याच सनबर्नने पुण्याच्या ग्रामीण भागातील केसनंद येथील डोंगर भाग निवडून फेस्टिवलचे नियोजन केले आहे. यानिमित्ताने पुण्यातील स्थानिक तरुणांना अमली पदार्थांची सवय लावून बिघडविण्याचे काम केले जाणार आहे आणि याचा कोणतीही इतिहास न पाहता महाराष्ट्र शासन याला बिनदिक्कत परवानगी देत आहे. केसनंद ग्रामस्थांचा विरोध दूर करण्यासाठी विकास निधी देण्याची आश्वासने सनबर्नच्या आयोजकाकडून दिली जात आहेत. या कार्यक्रमामध्ये गौडबंगाल नसते तर ग्रामस्थांना विकास निधीची आश्वासने का दिली जात आहेत? निवडणूका जवळ आल्याने निवडणूक फंड आणि आर्थिक फायदा साधण्यासाठीच याला पाठिंबा दिला जात असल्याचा घणाघाती आरोप यावेळी करण्यात आला. केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी (दि. २६) रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये सनबर्न कार्यक्रमाविषयी चर्चा केली जाणार आहे. आयोजकाच्या वतीने ग्रामस्थांना विकास निधी देण्याचे आश्वासन दिले गेल्याची चर्चा असल्याने ग्रामपंचायत परवानगी बाबत काय निर्णय घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
सनबर्न कार्यक्रमास पाठिंबा कशासाठी?
By admin | Published: December 26, 2016 2:19 AM