ज्याने स्वत:च्या वडिलांना, भावाला ठार मारले, अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण का? अमोल कोल्हेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:05 PM2022-05-13T16:05:28+5:302022-05-13T16:05:52+5:30
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना सभेआधी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती
पुणे : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना सभेआधी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. अकबरुद्दीन ओवेसी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली. औरंगजेबाच्या कबरीवर त्यांनी चादरही चढवली. त्यावरून अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा यावर सवाल उपस्थित केला आहे.
कोल्हे म्हणाले, हैदराबादचा एक नेता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन अभिवादन करतो. ज्याने स्वत:च्या वडिलांना, भावाला ठार मारले, असंख्य नागरिकांना कंठस्नान घातले अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण का? असा सवाल उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम होते. त्यांनी सर्वांना एकत्र करत रयतेचे राज्य आणले. जाती धर्म हे दगड आहेत, त्या दगडांची भिंत बांधली तर समाज तुटतो. त्याचा पूल बांधला तर समाज जोडला जातो. त्यामुळे पोटाच्या आगीचा प्रश्न सुटतो. शाश्वत विकास होतो. त्या विकासाची वाट या महाराष्ट्राला पवार साहेबांनी दाखवली.
युवकांनी ठरवावे कि दगडाचे काय करणार
महागाई, रोजगारी, हे प्रश्न बाजूला ठेवले आहेत. त्यावरून हे लक्ष विचलित करून मंदिर, गुरुद्वारा. मशीद यावर प्रश्न विचारले जात आहेत. यावेळी तरुणांनी उत्तर द्यायला हवे कि, महागाईचा काय झालं. जॉब मिळणार आहे का, तर आम्ही इतर गोष्टींकडे लक्ष देतो. जाती धर्मावरून दंगली घडवण्यासाठी युवकांना भडकवले जाते. त्यांच्या हातात दगड दिला जातो. अशा वेळी त्या दगडाने नुकसान करावे. कि तो दगड रचून विकासाच्या नव्या मार्गाला सुरूवात करावी हे युवकांनी ठरवलं पाहिजे असंही कोल्हे यावेळी म्हणाले.