डम्मीची बातमी
पुणे : सध्या जिल्ह्यात पाचवी ते आठवी इयत्तेचे वर्ग सुरू झाले आहेत. पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये केवळ ५० टक्के उपस्थिती असतानाच पहिली ते चौैथीच्या वर्गातील मुलांच्या पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत ‘नो मीन्स नो’ अशी भूमिका घेतली आहे. मुले मात्र घरी बसून कंटाळलेली असल्याने त्यांना शाळेत जाण्याचे वेध लागले आहेत. पाचवी ते आठवीच्या मुलांच्याही शाळा केवळ एका महिन्यासाठी कशाला सुरू करायच्या, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आला असला तरी पूर्णपणे ओसरलेला नाही. पालकांच्या मनातील कोरोनाची भीतीही गेलेली नाही. त्यातच शुक्रवारी कोंढवा परिसरातील एक शिक्षिका कोरोनाग्रस्त आढळून आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली ते चौैथीच्या मुलांना तर शाळेत पाठवण्याचे नावही काढू नका, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. दर वर्षी मार्च- महिन्यात शाळांच्या परीक्षा संपतात आणि एप्रिलपासून सुट्टी लागते. अशा वेळी दीड महिन्यासाठी शाळा सुरु करण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, अशी शंका पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शाळांची वेळ कमी करण्यात आली आहे. काही शाळांनी व्हॅन चालकांना मुलांची ने-आण करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, बहुतांश पालक मुलांना स्वत: सोडणे आणि घेऊन येणे पसंत करतात. व्हॅनचालक राजेंद्र कुमठेकर म्हणाले, ‘सध्या व्हॅनमध्ये ७ जणांना तर रिक्षात ३ विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास परवानगी आहे. गाडीचे दिवसातून दोनदा निजर्तुंकीकरण केले जाते. शाळेने आमचीही कोरोना तपासणी करुन अहवाल घेतला आहे. सातवी ते दहावीच्या मुलांना पालक व्हॅनमधून पाठवतात. मात्र, पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आॅनलाईन शाळेलाच प्राधान्य दिले आहे.’
----------------------
जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या शाळा - २८५७
विद्यार्थी - १,७७,४५७
महापालिकेच्या शाळा (पाचवी ते आठवी) - ९२५
सुरु झालेल्या शाळा - ७८१
विद्यार्थी संख्या - १५८५८३
उपस्थित विद्यार्थी संख्या - ४३२८०
-----------------
मुलांना हवी शाळा
मला एक वर्ष घरात बसून खूप कंटाळा आला आहे. आई-बाबांचे आॅफिसही सुरु झाले आहे. सकाळी दोन तास आॅनलाईन शाळा झाली की दिवसभर काय करायचे, असे वाटते. आजोबा घराबाहेर खेळायलाही सोडत नाहीत. त्यामुळे शाळा लवकर सुरु व्हावी आणि मित्र-मैैत्रिणींना भेटता यावे.
- पार्थ ढवळे, पाल्य, इयत्ता तिसरी
-------------------
शाळा सुरु झाली की मजा-मस्ती करता येते. सगळयांबरोबर मिळून डबा खाता येतो, खेळ खेळता येतात. शाळा बंद असल्यामुळे सगळे रुटीनच बिघडले आहे. शाळेत जावेसे वाटते आणि कोरोनाची भीतीही वाटते.
- गार्गी कुलकर्णी, पाल्य, इयत्ता पहिली
------------------------
वार्षिक परीक्षेला एक-दीड महिनाच राहिला आहे. असे असताना शाळा सुरु करण्याचा अट्टाहास का? नवीन शैैक्षणिक वर्षापासून आॅफलाईन शाळेचा श्रीगणेशा होऊ शकतो. मग शालेय प्रशासन मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना आताच का? वेठीला धरत आहे? मुलांचीही अजून शाळेत जाण्याची मानसिक तयारी झालेली नाही. त्यामुळे या सगळयाचा विचार करुन शाळा थेट जूनमध्येच सुरु करावी, अशी मागणी आहे.
- रमा फडणीस, पालक
--------------------------
मुलांना अजूनही सोशल डिस्टन्सिंगचे महत्व पूर्णपणे कळलेले नाही. मुले शाळेत गेली की एकमेकांच्या संपर्कात येणार, एकमेकांचे डबे खाणार...या गोष्टी कितीही काळजी घेतली तरी टाळता येण्यासारख्या नाहीत. आॅनलाईन शाळेचे वेळापत्रकही व्यवस्थित बसले आहे. त्यामुळे आता शाळा सुरु झाल्या तरी मुलांना पाठवण्याची आमची तयारी नाही.
- रुपाली कागले, पालक