पुणे - बहुचर्चित चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील पार पडले. पुण्यातील ८६५ कोटी रुपये किंमतीच्या एनडीए चौक (चांदणी चौक) प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे लोकार्पण आज झाले. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी, भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं. तसेच, पुण्याची वैशिष्टे सांगताना या चौकाला चांदणी चौक हे नाव का पडलं याचीही माहिती दिली. अर्थात, या चौकाची शासन दफ्तरी वेगळ्याच नावाने ओळख असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांनी भाषण करताना पुण्याची वैशिष्टे सांगताना पुण्यात असलेल्या अनेक देवांच्या मंदिरांची नावे घेतली. तर, नागपूरच्या अगोदर पुण्याला मेट्रो यायला पाहिजे होती, असेही म्हटले. याप्रसंगी मुख्यमंत्री उपस्थित नाहीत, कारण ते आजारी आहेत. मात्र, लगेच कोल्डवॉर म्हणत टीका केली जाते, असेही त्यांनी म्हटले. यावेळी, चांदणी चौकाला हे नाव का पडलं याचीही माहिती अजित पवारांनी दिली.
चांदणी चौकाचं नाव महानगरपालिकेच्या दफ्तरी एनडीए चौक असं आहे. मात्र, सुरुवातीपासूनच या चौकाला चांदणी चौक असं म्हणतात. जुनी लोकं सांगतात, जुन्या पुलावरील दगडावर चांदणी कोरलेली होती, म्हणून याला चांदणी चौक असं नाव पडल्याचा किस्सा अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रमात सांगितला. तसेच, यावेळी, दिल आणि बाणाचं उदाहरण देत मिश्कील टिप्पणीही केली. तरुण वर्गाकडून खडकावर, वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी अशी नावे कोरलेली असतात, याचा दाखलाच त्यांनी दिला.
आता, बऱ्यात दगडांवर बरीच नावं कोरलेली असतात. हर्ट (दिल) काढलेला असतो, बाण दाखवलेला असतो. आता त्याला कुठलं नाव द्यावं, तुम्हीच सांगा? अशी मिश्कील फटकेबाजीही अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रमात केली. सगळ्या पुणेकरांचं या चांदणी चौकावर प्रेम आहे, आणि नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीसांवरही प्रेम आहे, असेही यावेळी अजित पवारांनी म्हटलं.