पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे पेपर फुटल्याचे समोर आल्याने या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे.या निर्णयामुळे परीक्षा लांबणार असून महिन्याभरापेक्षा अधिक काळ विद्यार्थी परीक्षार्थीची भूमिका निभावणार आहेत. त्यामुळे वर्षभर अभ्यास करून परीक्षेनंतर सहल किंवा इतर काही आखलेले कार्यक्रमही अनेकांनी रद्द केले आहेत. कोणीतरी केलेल्या चुकीची शिक्षा संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना भोगावी लागणार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.१५ मार्च पासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. नियोज़नानुसार येत्या सोमवारी (दि.२) रोजी या परीक्षा संपणार होत्या. मात्र दहावीचा गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्राचा पेपरफुटल्याने पुन्हा परीक्षा होणार आहेत. यामुळे यंदा प्रथमच असल्याने महिन्याभरापेक्षा अधिक काळ परीक्षा सुरु राहण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थी साहजिकच नाराज झाले असले तरी निदान आता तरी गैरप्रकाराविना परीक्षा पार पडेल अशी त्यांना आशा आहे.
नववीच्या वर्गात विद्यार्थी गेले की त्यांना घरचे, बाहेरचे सगळे जण 'पुढच्या वर्षी अशा मजा नाही' असं बजावायला लागतात. त्याच्या करीअरमधला १०वी हा महत्वपूर्ण टप्पा आहे याची जाणीवही त्याला वेळोवेळी करून दिली जाते. प्रत्यक्षात विद्यार्थी १०वीमध्ये गेल्यावरही तर त्याला अधिकाधिक अभ्यास करण्याच्या सूचना वर्षभर मिळत असतात. अशात मार्च महिन्यात बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या की घरात अक्षरश: कर्फ्यूसारखे वातावरण तयार होते.यंदा मात्र सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हा कर्फ्यू अधिक काळ सहन करावा लागणार आहे.
या विषयावर आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. १०वी शिकणाऱ्या रिया सोनी हिने या निर्णयाचे स्वागत केले. आम्ही वर्षभर अभ्यास केला आहे. त्यामुळे चुकीचे मार्ग वापरून कोणी मार्क घेत असतील तर त्यांना शिक्षा व्हायला हवी. अभ्यास झालेला असल्याने पुन्हा परीक्षा घेण्यास हरकत नाही असंही ती म्हणाली.मधुरा शिर्के हिने मात्र काहीस वेगळं मत मांडलं असून पुढच्या वेळी परीक्षा देताना पेपर फुटणार नाही याची काय खात्री असा प्रश्न तिने विचारला. माझ्या अनेक मैत्रिणी परीक्षा संपल्यावर बाहेरगावी जाणार होत्या मात्र आता ते सर्व प्लॅन रद्द करावे लागणार आहे असेही तिने स्पष्ट केले. अनुश्री करवा हिने गणित आम्हाला अवघड होता. मात्र आजचा पेपर बघून मी खूप खुश होते. पण बातमी समजल्यावर आम्हा सर्व मैत्रिणींना धक्का बसला असून आता पुढे होणारा पेपर कसा येईल याचीचं धास्ती आहे असे ती म्हणाली. पालक रुपाली चाकणकर यांनी बोलताना हा निर्णय कळल्यावर मुलाने चिडचिड केल्याचे सांगितले. वर्षभर मुलं अभ्यास करत असून परत आता परीक्षेचा कालावधी वाढल्याने मुलाने चिडून आता अभ्यास करणार नसल्याचे सांगितले. आजचा पेपर चांगला गेला असतानाही दुसऱ्याच्या चुकीमुळे मार्क मिळणार नाही समजल्यावर त्याचे डोळे भरून आल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली. दुसऱ्या पालक राखी सोनी यांनीही पाच दिवस मुलांनी जीवाचं रान करून अभ्यास केल्यावर अशी वेळ येणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. यामुळे संपूर्ण सुट्यांचं नियोजन बिघडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.