इंदापूर : पोटाच्या मागे धावत परमुलखात तो आलेला...एका हॉटेलात काम करून तो आणि त्याची पत्नी पोट भरू लागले...मात्र नियतीने अचानक संसाराच्या दोन चाकातील एक चाक काढून घेतले..पत्नीचे निधन झाले. तिच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे पैसेही नाहीत. त्याची ना कोणाशी ओळख ना ‘जानपहचाण’. मात्र एका सामाजिक संघटनेचे कार्यकर्तेच त्याचे आप्त झाले. या कार्यकर्त्यांनी त्याच्या पत्नीच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च व विधीही केले. या माणुसकीच्या ओलाव्याने त्याचा दबलेला हुंदका बाहेर आला आणि ‘लाला’ कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे गहिवरला.लाला मदनलाल गवळी हा छत्तीसगड येथील रहिवासी. गेल्या काही दिवसांपासून लोणी देवकर येथील हॉटेलमध्ये काम करीत आहे. त्याची पत्नी सोनिया लाला गवळी ही असाध्य रोगाने आजारी होती. शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना, गुरुवारी (दि. ३) सकाळी ती मृत पावली. दु:ख व्यक्त करण्यासाठी कोणा नातेवाइकाचा खांदाही त्याच्या जवळ नव्हता. दु:खात कोणी वाटेकरी झाले, तर सहवेदना ही संवेदनामध्ये बदलतात...काळीज हलके होते. नेमका हाच अनुभव छत्तीसगड येथील लालाने घेतला. हॉटेलकामगाराला पगार तो कितीसा असणार आहे. रिकामा खिसा... समोर पत्नीचा मृतदेह... अंत्यसंस्कारालासुद्धा पैसे नाहीत. परमुलखात कुणापुढे हात पसरायचे, या विचाराने त्याची वेदना अधिकच दीनवाणी होत होती. एवढ्यात ‘चिऊताईच्या डब्यासाठी’ आज किती रुग्ण आहेत, याची चौकशी करण्यासाठी प्रशांत सिताप व त्यांचे सहकारी तेथे आले. त्यांचे लालाकडे लक्ष गेले. चौकशीअंती परिस्थितीची कल्पना आली. सिताप यांच्या स्क्रॅप बँकेची सारी यंत्रणा फिरली.गफूरभाई सय्यद, धरमचंद लोढा, आनंद व्यवहारे, बाळासाहेब क्षीरसागर, प्रवीण धार्इंजे, नरेंद्र गांधी, सीमा कल्याणकर यांनी अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव केली. दुपारी एक वाजता हिंदू स्मशानभूमीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ना ओळखीची ना पाळखीची ‘माणसं’ आली. एका कुटुंबातील नसतानादेखील अक्षरश: आप्तस्वकियांची देखील आठवण होऊ नये, अशी झटली. या बद्दलच्या कृतज्ञतेपोटी लालाला गहिवरून आले होते. त्याच्या दाटलेल्या घशातून न फुटणारे शब्द मुकेपणातून माणुसकीची गाथा सांगत होते.
रिकामा खिसा...समोर पत्नीचा मृतदेह..
By admin | Published: March 05, 2016 12:41 AM