कारेगाव : जुलै महिना सुरू झाला, तरी अद्याप कांद्याच्या भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी वखारीत साठवून ठेवलेला कांदा सडायला लागल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून कांद्याचे दर दहा किलोला ४० रुपये स्थिर आहेत. त्यात समाधानकारक वाढ होत नाही. अपवाद वगळता सरासरी शेतकऱ्यांना किलोला चार ते पाच रुपयेच बाजार मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघत नाही, तर काही शेतकरी कांदा सडण्यापूर्वीच नुकसान सहन करून विक्री करीत आहेत. मागील वर्षी कांद्याच्या बाजारात वाढ होण्यापेक्षा घट झाल्याने वाहतूक खर्चही निघत नव्हता. परिणामी, अनेक ठिकाणी वखारीतच कांदा सडला तर काही शेतकऱ्यांनी जनावरांना चारला. यावर्षीसुद्धा बाजार नसल्याने उभ्या पिकात जनावरे सोडली. पुढील काळात चांगला बाजार मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढणीनंतर वखारीत ठेवला आहे. परंतु, मागील वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा कांदा फेकून द्यावा लागेल की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. मागील, वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने राज्यात कांद्याची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य हे कांदा उत्पादनातील प्रमुख राज्य आहे. देशात सुमारे २१५ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले. त्यामुळे साहजिकच उत्पादन जास्त व मागणी कमी झाल्याने कांद्याचे बाजारभाव कोसळले. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे उत्पादन वाढले. त्याचा फटका थेट बाजारभावावर झाला. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले जाते. तीन वर्षांपासून बाजार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.निर्यातीस मुदतवाढ मिळूनही वाढेना बाजार जून महिन्याच्या अखेरीस कांदा निर्यातीवरील अनुदान योजनेची मुदत संपली होती. केंद्र शासनाने तीन महिने मुदतवाढ दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यात आशेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, बाजारात कांद्याचे भाव वाढत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बाजार वाढेल की नाही, या चिंतेने शेतकरी कांदा बाजारात पाठवण्याची लगबग करत आहे.
वखारीतला कांदा लागला सडू
By admin | Published: July 07, 2017 2:53 AM