लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाकाळात निर्बंधांचा बाऊ करत शांत बसून राहण्याऐवजी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने त्यांच्याकडे नोंदणी झालेल्या संस्थांंना मदतीचे आवाहन केले व सत्कार्याचा एक मोठा सेतूच त्यातून उभा राहिला. सर्वधर्मीय संस्था, संघटनांचा यात समावेश आहे.
मोठ्या संस्थांंनी मोठा, तर लहान संस्थांनी त्यांंना झेपेल असा भार उचलला आहे. रुग्णवाहिकांपासून ते रोज अन्नदान व वैद्यकीय मदतीपासून ते विलगीकरणासाठी जागा देण्यापर्यंतची सर्व प्रकारची लहानमोठी मदत यात आहे.
जेजुरीच्या मार्तंड देवस्थानने २०० खाटांचे कोरोना केअर सेंटर सुरू केले. पुण्यातल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून तसेही कायम समाजकार्य सुरूच असते, पण या कोरोना काळात ते गेले वर्षभर ससूनमध्ये दररोज कोरोना रुग्णांना जेवण देत आहेत. चिंचवडच्या मोरया देवस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपये दिले.
क्रम्प सीख असोसिएशन यांच्या वतीने ऑक्सिजन व अन्य उपकरणांची व्यवस्था करण्यात येत आहे. गुरूद्वारा गुरूसिंग सभेच्या वतीने दररोज लंगर चालवण्यात येतो. मशिदी, चर्च तसेच अन्य धर्मीयांच्या लहानमोठ्या संस्थांकडूनही अन्नदानासारखी सामाजिक कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. सासवडच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने १५० खाटांचे कोरोना केअर सेंटर उभे केले आहे. काही संस्थांनी अशा सेंटरसाठी आपल्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के म्हणाले की सामाजिक संस्था म्हणूनच अशा संस्थांची नोंदणी होत असते. ते कार्यरत असतातच. सहज म्हणून त्यांना कोरोनाकाळात मदतीचे आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समाधान आहे.