लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनमध्ये पत्नीऐवजी बनावट महिलेला मास्क परिधान करून उभी करत पत्नीच्या नावावर असलेली मिळकत (३ फ्लॅट व एक दुकान) स्वत:च्या नावावर केल्याबाबतची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायाधीश के. प. नांदेडकर यांनी पती व व त्याला मदत करणाऱ्या मित्राचा अटकपूर्व जामीन शुक्रवारी फेटाळला.
पती राहुल शिवाजी जाधव व त्याचा मित्र दीपक चव्हाण अशी अर्ज फेटाळलेल्यांची नावे आहेत. कविता राहुल जाधव (रा. आंबेगाव पठार, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे पती व त्याच्या मित्रांसह इतर व्यक्तींविरुद्ध बनावट दस्त करून करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये पती राहुल शिवाजी जाधव व त्याचा मित्र दीपक चव्हाण यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन सविस्तर तपास करणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले. दोघांना जामीन मंजूर करू नये यासाठी अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी मूळ फिर्यादी कविता राहुल जाधव यांच्यातर्फे तीव्र विरोध केला होता, सरकार पक्षातर्फे अॅड. सुनील हांडे यांनी काम पाहिले.
--------------------------------