पुणे : आएएएस, आयपीएस आणि राजकीय लोकांसोबत आपली मोठी ओळख असल्याचे सांगून, आर्थिक गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत, एका आयटी अभियंत्याला ४७ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १० डिसेंबर, २०२१ ते २० एप्रिल, २०२२ या दरम्यान घडला.
याबाबत बाणेर येथील ३५ वर्षांच्या अभियंत्याने फिर्याद दिली. त्यावरून चतुःश्रृंगी पोलिसांनी दीपक रमेश शिंदे (वय २७, रा.बाणेर, मूळ रा.बेलपिंपळगाव नेवासा) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी दीपक शिंदे हा लोकसेवा व राज्यसेवेची तयारी करत होता. मित्राच्या माध्यमातून त्याचा फिर्यादी अभियंता शिंदे याच्यासोबत परिचय झाला होता. त्यावेळी आराेपीने फिर्यादीला सीए फायनान्सर, शेअर मार्केट, स्वामी समर्थ पंडित, हात पाहतो, लोकांच्या घरी जाऊन पूजाअर्जा करतो, तसेच स्पर्धा परीक्षेचीही तयारी करतो, असे सांगितले हाेते. पोलीस व महसूल खात्यातील अधिकारी यांच्याशी जवळचा परिचय असून, त्यांनी त्यांचे पैसे गुंतवणुकीसाठी ठेवल्याचेही तो सर्वांना सांगत असे, तसेच त्याची बहीण अहमदाबाद येथे जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादींना जाळ्यात खेचले हाेते.
शिंदे याने फिर्यादींना सांगितले की, आपण सरकारची जमीन विकत घेणार आहोत. त्यामध्ये गुंतवणूक करू, तसेच माझ्याकडे मोठमोठे फायनान्सर आहेत. ते अल्पकालावधीची गुंतवणूक करतात. त्या बदल्यात मी तुला १० ते २० टक्के व्याज देईन, असे सांगून वेळोवेळी फिर्यादी अभियंत्याकडून ४७ लाख ८० हजार रुपये घेतले. एवढेच नाही, तर अभियंत्याच्या पत्नीकडूनही त्याने पैसे घेतले आहेत.
पत्नीची आई आजारी पडल्यानंतर अभियंत्याने शिंदे याच्याकडे ६ लाखांची मागणी केली. त्यावेळी त्याने ६ लाख रुपये पाठविल्याचा मेसेज पाठविला. मात्र, बँकेत चौकशी केली असता, तो बनावट असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली.