पुणो : घराच्या भिंतीला तडे गेल्याचे गुरुवारी दुपारी चार वाजताच निदर्शनास आले. मात्र, त्याचा एवढा मोठा परिणाम होईल, याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे रात्री घरीच मुक्काम केला. मात्र, ज्या वेळी इमारतीचे कॉलम फुटण्यास सुरुवात झाली आणि इमारत हादरण्यास सुरुवात झाली. या वेळी पत्नी आणि मुलासह घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजावर भितींचे वजन आल्याने तो उघडतच नव्हता. अखेर दरवाजा तोडून पत्नी आणि लहान मुलाला वाचविल्याचे न:हे येथे कोसळलेल्या इमारतीमधील चौथ्या मजल्यावर राहणारे रहिवासी प्रवीण हेगडे यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर संपूर्ण दिवसभर हेगडे आपल्या चिमुरडय़ाला कडेवर घेऊन खिन्न नजरेने कोसळलेल्या इमारतीकडे पाहताना दिसत होते. (प्रतिनिधी)
हेगडे काही महिन्यांपासून या इमारतीत राहत आहेत. सुटी असल्याने घरीच असलेल्या हेगडेंना आपल्या घराच्या इमारतीला दुपारी चारच्या सुमारास मोठे तडे गेल्याचे दिसून आले. त्या वेळी हेगडे यांनी याच इमारतीत तळमजल्यावर असलेल्या संबंधित बांधकाम व्यवासायिकाच्या कार्यालयाशी संपर्क साधला, या वेळी या भेगांची तपासणी करण्यासाठी आलेल्या काही कर्मचा:यांनी घाबरण्याचे कारण नाही, ही बाब किरकोळ आहे. उद्या दुरूस्त करून देतो, असे सांगितले. मात्र, पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान अचानक भूकंप आणि कशाला तरी तडे जात असल्याचा आवाज आला. म्हणून घाबरून पत्नी व मुलीला घेऊन घराबाहेर जाण्यास दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो उघडतच नव्हता. त्यामुळे आपण घाबरलो होतो.