लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीला वेगळे राहायचे असून त्याला सासुसासरे, मेहुणा हे फूस लावतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना धनकवडीमध्ये घडली आहे. पत्नी, सासू सास-यांच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.
शरद नरेंद्र भोसले (वय ३०, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शरद भोसले यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात संशयी पत्नी व तिचे आईवडील, भाऊ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
सहकारनगर पोलिसांनी पत्नी प्रियंका शरद भोसले (वय २८), मेहुणा मनीष ऊर्फ गणेश शंकर शिंदे (वय २७), शंकर शिंदे (वय ५६), रोहिणी शंकर शिंदे (वय ५०, सर्व रा. कवडीपाट, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी नरेंद्र दत्तात्रय भोसले (वय ५८, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
शरद आणि प्रियंका यांचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून प्रियंकाला वेगळे राहायचे होते. त्यासाठी ती शरद याच्याशी भांडणे करीत व माहेरी निघून जात असे. माहेरी तिचे आईवडील तिला फूस लावत असत. प्रियंका शरदच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्याच्याशी भांडणे करीत होती. काही दिवसांपूर्वी शरदचा मेहुणा मनीष याने त्यांच्यातील भांडणे मिटविण्यासाठी शरद व त्यांच्या वडिलांना मार्केट यार्ड परिसरात बोलावून घेतले होते. तेथे त्याने दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली होती.
पत्नीची सातत्याने करीत असलेल्या तक्रारी व माहेरी निघून जाण्याच्या प्रकाराने शरद याने कंटाळून २९ ऑगस्ट रोजी बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शरद याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यात पत्नीचे सातत्याने माहेरी निघून जाणे, सासू-सासरे तिला भडकावतात, त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे अधिक तपास करीत आहेत.
गोखलेनगरमधील निखिल शाम धोत्रे (वय २९) या तरुणाने २२ ऑगस्ट रोजी पत्नी व सासू-सासरे यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. निखिल याच्या पत्नीने आपल्याला जबरदस्तीने फिनाइल पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्यादी चतु:श्रृंगी पोलिसांकडे दिली होती. त्यावरून पोलिसांनी निखिल, त्याची आई व भावावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर निखिलने आत्महत्या केल्यावर पोलिसांनी त्याची पत्नी व सासू-सास-यांवर गुन्हा दाखल केला आहे.