लासुर्णे:खेडेगावात हेलिकॉप्टर येणे म्हणजे आजही नवलच मानले जाते. एखाद्या मंत्र्याची सभा अथवा एखाद्या कार्यक्रमाला '' व्हीआयपी''दौरा हेलीकॉप्टरमधुन येतात. मात्र,रविवारी (दि १) येथील विवाहासाठी नवरी मुलगी चक्क हेलीकॉप्टरने पोहचली. हौसेला मोल नसते,या म्हणीचा आज बेलवाडी करां प्रत्यय आला.बेलवाडी (ता.इंदापूर) येथील कांतिलाल जामदार यांचा मुलगा अक्षय व बिटरगाव (ता. करमाळा) जि. सोलापूर येथील शिवाजीराव पाटील यांची मुलगी स्नेहल यांचा विवाहसोहळा आज हिराबाई हरीभाऊ देसाई विद्यालयात पार पडला. यावेळी पाटील यांनी आपल्या लाडक्या मुलीला थेट हेलीकॉप्टरने विवाहासाठी आणले. बेलवाडी सारख्या ग्रामीण भागात देखील नवरी मुलगी लग्नमंडपात हेलिकॉप्टर ने आल्याने हा विषय चर्चेचा ठरला. सैराट चित्रपटाच्या वेळी बिटरगांव चर्चेत आले होते.आज पुन्हा हे बिटरगाव तेथील पाटलांनी मुलीची केलेल्या आगळ्यावेगळ्या हौसेमुळे कौतुकाचा विषय ठरले. आपल्या लाडक्या मुलीचे व-हाड चक्क हेलीकॉप्टरने आणल्याने ग्रामीण भागातील नागरीकांनी हा क्षण आपल्या लक्ष लक्ष डोळ्यांनी अनुभवला.हेलीकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पूर्वी वºहाड म्हटलं की बैलगाडी , ट्रॅक्टर चा ग्रामीण भागात वापर होत असे. त्यांनंतर अलीकडील काळात आराम बसचा वापर वाढला.मात्र, शेतकऱ्यांच्या मुलीचे वºहाड आता हेलीकॉप्टरने येवु लागले आहे.पुर्वी उद्योजक,व्यापाऱ्यांच्या घरात हेलीकॉप्टरचा वापर होत असे.मात्र, बिटरगावच्या पाटलांनी तर आपल्या लाडक्या मुलीला विवाह सोहळ्याला चक्क हेलीकॉप्टरच बेलवाडी गावात उतरविले. सध्या स्पर्धेचे युगात ग्रामीण भागदेखील अग्रेसर असल्याचा प्रत्यय आज अनेकांनी अनुभवला.
नादखुळा; हौसेला नसते मोल..! नववधूची एन्ट्री ती पण थेट हेलिकॉप्टरमधून...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 2:57 PM