पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील प्रत्येक गोष्टींची राजकीय वर्तुळात चर्चा होते. त्यात, पवार कुटुंबातील इतर सदस्यांच्या भूमिकेकडे आणि हालचालींकडेही सर्वांचे लक्ष असते. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी राजकीय प्रवेशावर भाष्य करताना दादांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर मी आहेच, असं म्हटलं होतं. तर, आता सुनेत्रा पवार याही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रीय झाल्याचं दिसून येतं. पुण्यात मंगळागौर निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी अजित पवारांसाठी खास उखाणा घेतला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी घेतलेल्या उखाण्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे शहरात मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी, प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्रा पवार यांचाही सहभाग कार्यक्रमात होता. या कार्यक्रमात अजित पवारांसाठी पत्नी सुनेत्रा पवार यांनी खास उखाणा घेतला.
पतीसाठी उखाणा घेण्याची मराठमोळी पद्धत प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. त्यामुळे, पत्नीचा उखाणा किंवा उखाणा घेणाऱ्या महिलेच्या शब्दांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. येथील मंगळागौर कार्यक्रमात जेव्हा सुनेत्रा पवार यांना उखाणा घेण्याची विनंती झाली, त्यावेळी, त्यांनी अफलातून उखाणा घेत कार्यक्रमातील उपस्थितांची मने जिंकली. आता, हाच उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या माध्यमातून तो सर्वदूर पोहोचला असून राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शेअर करत आहेत.
असा घेतला उखाणा
गणपतीला वाहते दुर्वापांडुरंगाला वाहते तुळशीअजितरावांचे नाव घेतेराष्ट्रवादीसोबत मंगळगौरीच्या दिवशी
दरम्यान, या कार्यक्रमातच हा उखाणा अजित दादांपर्यंत लाईव्ह कार्यक्रमातून पोहचल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. त्यावेळी, उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या संसाराला ३७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना, पार्थ आणि जय पवार अशी दोन मुले असून पार्थ पवार हे राजकारणात सक्रीय आहेत.