बुवाबाजी विरोधात साडेसहाशे गुन्हे : कायद्याची प्रभावी अंमलबजावणी नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकविसाव्या शतकात विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अनेकांच्या डोक्यातून अंधश्रद्धेचे खूळ अद्यापही कमी झालेले नाही. यात सुशिक्षितदेखील मागे नाही. ‘पत्नी पांढऱ्या पायाची असल्याचे सांगून करणी करणे’, ‘पैशांचा पाऊस पाडून देतो’, ‘विशिष्ट अंगारा लावला तर पुत्रप्राप्ती होईल’, गुप्तधन, नरबळी, नग्नपूजा, लैंगिक शोषण असले प्रकार थांबलेले नाहीत. कोरोना काळात अशा घटना वाढल्या असून बुवाबाजी विरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात आत्तापर्यंत सुमारे ६५० ते ७०० गुन्हे दाखल आहेत. पुण्यात सुमारे चाळीस गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
आजही समाजात बुवाबाजी, मांत्रिकांकरवी होणारे अघोरी प्रकार घडताना दिसतात. असाध्य रोग बरे करण्याच्या आमिषांविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने आवाज उठवत आहे. समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर २६ ऑगस्ट २०१३ रोजी तत्कालीन सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर केले. या कायद्याचा प्रसार करण्याचे काम अंनिस व अन्य संघटना करतात. भानामती, नरबळी, चमत्काराचा दावा करून महिला व मुलींचे लैंगिक शोषण, जादूटोणा, भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, पैशांचा पाऊस पाडून देण्यासाठी आर्थिक फसवणूक, पूजेला विवस्त्र बसण्यासाठी महिलांना जबरदस्ती अशा घटनांविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात गुन्हे दाखल होत आहेत. मात्र, अजूनही जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि याबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे अंनिसने सांगितले.
चौकट
विश्रांतवाडीत दाखल झाला होता पहिला गुन्हा
पुण्यातल्या विश्रांतवाडी येथे पहिला गुन्हा दाखल झाला होता. कोंढव्यात एकाला सहा लाखांची कबुतरे घ्यायला लावून माणसाचे सर्व आजार कबुतरामध्ये जातील असे सांगण्यात आले होते. पत्रिका पाहून रत्न देणे, पिंपरीतल्या नेहरूननगर येथे मुलगा होत नाही म्हणून कुटुंबातील मुलींचे लैंगिक शोषण करणे अशाही घटना पुण्यात उघडकीस आल्या. या विरोधात अंनिसने गुन्हे दाखल केले. नुकतेच औंध येथील गायकवाड कुटुंबाला भोंदू बाबा रघुनाथ येमूलला सुनेचा छळ करण्यास प्रवृत्ती केल्याप्रकरणी अटक झाल्याचे प्रकरण चांगलेच गाजले. गेल्या दीड वर्षाच्या कोरोना काळात मुलाची नोकरी गेली, लग्न ठरत नाही म्हणून ज्योतिषांकडे जाण्याचे प्रमाणही वाढले आहे.
चौकट
पोलिसांना सांगावे लागते
“आजही समाजात भानामती, नरबळीसारख्या अनेक घटना घडतात. यात सुशिक्षितांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अनेकदा एखाद्या घटनेला जादूटोणा विरोधी कायद्यातील कलम लागू होते. मात्र कित्येकदा पोलिसांकडून या कायद्याअंतर्गत गुन्हाच दाखल होत नाही. आम्हाला पोलिसांना सांगावे लागते. या कायद्याबाबत अजूनही म्हणावे तितके प्रबोधन झालेले नसल्याने कायद्याची अंमलबजावणी प्रभावी होत नाही.”
- नंदिनी जाधव, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस