पुणे : दोघेही उच्चशिक्षित. तो नोकरी करतो, तर ती गृहिणी आहे. लग्नानंतर दोघांचा जेमतेम तीन महिनेच संसार चालला. त्यानंतर ती माहेरी निघून गेली आणि २०१८ मध्ये तिने पतीविरुद्ध पोटगीचा दावा दाखल केला. मात्र, महिलेने मित्राशी चॅटिंग केल्याचा पुरावा ग्राह्य धरत तिने पतीकडे मागितलेल्या पोटगीचा दावा लष्कर येथील सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चं. ना. ओडरे यांनी फेटाळला.
स्मिता व राकेश (नावे बदललेली आहेत) यांचा विवाह सन २०१६मध्ये झाला. लग्नानंतर जेमतेम तीन महिनेच संसार चालला. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. त्यानंतर २०१८ मध्ये तिने पतीविरुद्ध पोटगीचा दावा दाखल केला. पतीने शारीरिक व मानसिक छळ करून घरातून हाकलून दिल्याचे आरोप केले. पतीतर्फे ॲड. जयकुमार कदम यांनी न्यायालयात कामकाज पाहिले.
न्यायालयासमोर पत्नीने पतीविरुद्ध केलेल्या आरोपाचे खंडन करून पतीकडे तीन महिने राहायला असताना कोणतेही वैवाहिक संबंध तिने ठेवले नाहीत. याउलट तिने तिच्या मित्राशी व्हाॅट्सॲप चॅटिंग केल्याचे पुरावे सादर केले व पतीने कोणताही शारीरिक व मानसिक छळ केला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. भारतीय पुरावा कायदा कलम ६५ ब चे प्रमाणपत्र देऊन व्हाॅट्सॲप चॅटिंग पुरावा म्हणून सादर केले.